मुंबई:  गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊचच्या चर्चेने जोर धरला आहे.  बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचचं समर्थन केल्यानंतर, विविध प्रतिक्रिया येत आहेत.


काँग्रेसच्या माजी खासदार रेणुका चौधरी यांनी सर्वच क्षेत्रात कास्टिंग काऊच होत असल्याचं सांगत, महिला खासदारही त्यातून सुटलेल्या नसल्याचं म्हटलं.

त्यानंतर आता मराठमोळी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधवने धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

कास्टिंग काऊच कॉमन

“फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊच सामान्य आहे. प्रस्थापित लोकांकडून लैंगिक शोषण हे सुद्धा कॉमन आहे. मला एकदा विचारण्यात आलं जर तुला संधी दिली, तर त्याबदल्यात काय देशील? यावर मी त्यांना माझ्याकडे पैसे नाहीत, असं सांगितलं. त्यावर तो म्हणाला, नाही, नाही, नाही.. पैशाची गोष्ट नाही, जर कोणाला  तुझ्यासोबत झोपायचं असेल, मग तो निर्माता असो वा डायरेक्टर”, अशी धक्कादायक विचारणा झाल्याचं उषा जाधवने सांगितलं.

सिनेमात काम करण्यासाठी मी घरातून पळून मुंबईला आले. मात्र इथे ‘कास्टिंग एजंट’कडून माझं अनेकवेळा लैंगिक शोषण झालं, अशी धक्कादायक माहितीही उषा जाधवने दिली.

“एक अभिनेत्री म्हणून तुला शक्य तेव्हा आनंदाने लैगिंक संबंध ठेवावे लागतील. तो बोलता बोलता मला कुठेही स्पर्श करत होता, माझं चुंबन घेत होता. त्या धक्क्याने मी स्तब्ध झाले होते. मी त्याला रोखलं असता, त्याने तुला इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय की नाही, अशी विचारणा करत, तुझा अॅटिट्यूड योग्य नसल्याचं  म्हणाला” असं उषाने सांगितलं. 

कास्टिंग काऊचवर बीबीसी डॉक्युमेंटरी बनवत आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये उषा जाधव, राधिका आपटे यासारख्या अभिनेत्रींची कास्टिंग काऊचबाबतची मतं जाणून घेतली आहेत. लवकरच ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित होणार आहे.

कोण आहे उषा जाधव?

उषा जाधव ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती मराठमोळी अभिनेत्री आहे. उषा जाधवचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये झाला.

उषाने अभिनय कारकीर्दीची सुरुवात नाटकातून केली होती. 2012 प्रदर्शित झालेला 'धग' सिनेमा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला.

या सिनेमात तिने एका टीनएज मुलाच्या आईची भूमिका साकारली होती. मुलाच्या शिक्षणासाठी समाजाविरुद्धचा तिचा संघर्ष सिनेमात दाखवण्यात आला आहे. अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये ह्या चित्रपटाचा डंका पाहायला मिळाला. अनेकांनी तिची तुलना थेट स्मिता पाटील यांच्याशी केली.

उषाचा हिंदीतही ठसा

मराठी नाटक, चित्रपटांसह उषा जाधवने हिंदीतही आपला ठसा उमटवला. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या 'ट्रॅफिक सिग्नल'मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याशिवाय तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. 2012 मध्ये ती महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'कौन बनेगा करोडपती'च्या जाहिरातीतही झळकली होती. याशिवाय स्टार प्लसवरील 'लाखो में एक' या कार्यक्रमात उषाने काम केलं होतं.

तेलुगू अभिनेत्रीचं अर्धनग्न आंदोलन
तेलुगू फिल्म इंड्रस्टीमध्ये करिअर करण्याच्या प्रयत्नात असलेली अभिनेत्री श्री रेड्डीने अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करत चित्रपटसृष्टीतील काळं सत्य समोर आणलं. या अभिनेत्रीने आंदोलनाद्वारे तेलुगू फिल्म इंड्रस्टीमधील कास्टिंग काऊचच्या मुद्द्याला वाचा फोडली होती.

त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमधील कास्टिंग काऊचबद्दल चर्चा सुरु झाली आहे.

सरोज खान यांचं समर्थन

"फिल्म इंडस्ट्री कोणत्याही मुलीवर बलात्कार करुन  सोडून देत नाही, तर त्यांना काम आणि रोटी पण देते,"  असं म्हणत सरोज खान यांनी एकप्रकारे कास्टिंग काऊचचं समर्थन केलं. त्या सांगलीत बोलत होत्या.

महिला खासदारही सुटल्या नाहीत

“कास्टिंग काऊच केवळ फिल्म इंडस्ट्रीमध्येच होतं असं नाही, तर प्रत्येक ठिकाणी होतं. महिला खासदार यातून सुटलेल्या आहेत असं समजू नये. त्यामुळे आता हा मुद्दा उपस्थित करुन, देशाने एकत्र होणं गरजेचं असून, Me Too अर्था मी सुद्धा पीडित आहे”, असं म्हणायला हवं, असं काँग्रेसच्या माजी खासदार रेणुका चौधरी म्हणाल्या.

संबंधित बातम्या

नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून कास्टिंग काऊचचं समर्थन