महेश भट्ट यांच्या हत्येचा कट, 10 गँगस्टर्सना पाच वर्षे शिक्षा
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 25 Apr 2018 08:43 PM (IST)
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या दहा गुंडांना मुंबई सत्र न्यायालयानं पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या दहा गुंडांना मुंबई सत्र न्यायालयानं पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे, तर या प्रकरणी अटकेत असलेल्या रविकेश सिंह आणि युसुफ बचकाना या दोघांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. इशरत, अज़ीम, अशफाक, आसिफ ,शाहनवाज़, फिरोज़, शब्बीर, रहीम आणि अनीस अशी या दहा जणांची नावं आहेत. या प्रकरणी एकूण 13 जणांना अटक झाली होती. या सर्व आरोपींवर हत्येचा कट रचणे आणि शस्त्रास्त्र कायद्या अंतर्गत खटला चालवण्यात आला. रवी पुजारीच्या आदेशानुसार 2015 मध्ये महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, मात्र याची कुणकुण गुन्हे शाखेला लागली आणि 17 नव्हेंबर 2015 रोजी मुंबई पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या. जुहूमध्ये सिनेनिर्माते करीम मरोनी यांच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना अटक केली होती. या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीनं मोरानी ब्रदर्स आणि महेश भट्ट यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या शूटर्सना 11 लाख रुपये दिले होते. यापैकी पाच लाख रुपये या आरोपींना मिळाले होते.