नवी दिल्ली: अभिनेता संजय दत्तच्या मागे लागलेला कोर्टाचा ससेमिरा अजूनही कायम आहे. कारण आता उत्तर प्रदेशातील एका स्थानिक कोर्टाने संजय दत्तला समन्स बजावलं आहे.


संजय दत्तने 2009 मधील लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मायावतींना ‘जादू की झप्पी’ देऊ असं म्हटलं होतं. त्यावरुनच हा वाद कोर्टात गेला.

काय आहे नेमकं प्रकरण?

लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीत संजय दत्त उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचा प्रचार करत होता. त्यावेळी 19 एप्रिल 2009 च्या प्रचारसभेत संजय दत्तने त्याच्या मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमातील ‘जादू की झप्पी’ हा डायलॉग उपस्थितांसमोर मारला होता. तसंच एक जादू की झप्पी त्यावेळच्या सपाच्या प्रमुख विरोधक मायावतींनाही देऊ इच्छितो असं संजय दत्त म्हणाला होता.

संजय दत्तच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत कोर्टात खटला दाखल करण्यात आला. त्यावरुन उत्तर प्रदेशातील दंडाधिकारी न्यायालयाने संजय दत्तला समन्स बजावला आहे. या समन्समध्ये संजय दत्तला 16 नोव्हेंबरला कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोर्टाने मुंबई पोलीस आयुक्तांनाही संजय दत्तला समन्स बजावण्याचे आदेश दिले आहेत.