मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. गोरेगाव पूर्वेला बिग बींच्या नव्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामा प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्र रिजनल अँड टाऊन प्लानिंग (महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन) च्या वतीने ही नोटीस बजावण्यात आली आहे.


गोरेगावमध्ये आबा करमरकर मार्गावर सिबा लेआऊटमध्ये ओबेरॉय सेव्हन कॉम्प्लेक्समध्ये बिग बींनी नवा बंगला खरेदी केला. अमिताभ यांच्या वास्तुविशारदाने इमारतीचे प्रस्ताव सादर केले होते, मात्र त्यासंबंधीचे सुधारित आराखडे नामंजूर केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली आहे.

जिन्याला सुरक्षा जाळी नसणे, भिंतींना आतून सिमेंटचे प्लॅस्टरिंग नसणे, लिफ्ट नसणे, जिना आणि तळमजल्यावर टाईल्स नसणे, अशी अनियमितता आढळून आल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र पाठवून ताबडतोब एमआरटीपी कायदा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

त्याचप्रमाणे बच्चन यांना या प्रकरणात एकूण 15 नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रतीक्षा बंगल्याबाहेरील जमिनीचा एक भाग बच्चन कुटुंबाला रस्ता रुंदीकरणासाठी सोडावा लागणार आहे. प्रतीक्षापासून इस्कॉन मंदिराकडे जाण्यासाठी लागणारा ट्रॅफिक कमी करण्यासाठी 40 फूट रुंद रस्ता वाढवून 60 फुटांचा केला जाईल. हा बंगला अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन आणि भाऊ अजिताभ बच्चन यांच्या नावावर आहे.

यापूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मा, कपिल शर्मा, अर्शद वारसी यारख्या सेलिब्रेटींना अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेने नोटीस बजावली आहे.