ठाणे : सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) लीक प्रकरणात बॉलिवूडमधील आणखी एक मोठं नाव समोर आलं आहे. ठाणे गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी अभिनेत्री उदिता गोस्वामीची सीडीआर प्रकरणात चौकशी केली. उदिताने तिचा वकील रिजवान सिद्दिकीच्या मदतीने पती मोहित सुरीच्या फोनचे सीडीआर मिळवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने या प्रकरणात उदिता गोस्वामीची जवळपास तीन तास चौकशी केली.


उत्तराखंडच्या देहरादूनमधून मॉडेलिंगची सुरुवात करणाऱ्या उदिता गोस्वामीने पाप, जेहेर, अक्सर यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. आता सीडीआर प्रकरणात उदिताचं नाव आल्याने ती गोत्यात आली आहे.

उदिताने तिचा पती मोहित सुरीचे सीडीआर मिळवल्याचा आरोप होतो आहे. यासंदर्भात माहिती मिळताच ठाणे गुन्हे शाखेने उदिताला गाठून तिचा जबाब नोंदवला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, 2013 साली उदिताने वकील रिजवान सिद्दिकीच्या मदतीने पती मोहित सुरीच्या फोनचे सीडीआर मिळवले. पोलिसांना यासंदर्भात रिजवान आणि उदिता यांच्यातील चॅटिंगवरुन माहिती मिळाली.

उदिताची चौकशी आरोपी म्हणून नव्हे, तर साक्षीदाराच्या स्वरुपात सुरु आहे आणि त्यांना केवळ जबाब नोंदवण्यासाठी बोलवले होते, असे पोलिसांनी सांगितले.

जबाब नोंदवल्यानंतर उदिता गोस्वामी आणि मोहित सुरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सीडीआर प्रकरणात आमच्यावर कोणतेही आरोप नाहीत. आम्ही केवळ पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करण्यासाठी आलो होतो.

सीडीआर प्रकरणात सिनेक्षेत्रातील अनेक मोठ्या कलाकारांच्या चौकशीच्या तयारीत पोलिस आहेत. आतापर्यंत नवाजुद्दीन सिद्दिकी, आएशा श्रॉफ आणि आता उदिता गोस्वामी यांची नावं सीडीआर प्रकरणाशी जोडले गेले आहे.

या प्रकरणात उदिता यांच्या आणखी चौकशीची गरज भासल्यास, त्यांची पुन्हा चौकशी केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.