सातारा : साताऱ्यात सुपरस्टार अक्षयकुमारच्या 'केसरी' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सेटवर आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अक्षयकुमारसह सर्वजण सुखरुप आहेत.


साताऱ्यात पिंपोडे बुद्रुक गावामध्ये अक्षयकुमारच्या 'केसरी' सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. अक्षयकुमार ट्विटरवर आपले लूकही पोस्ट करत आहे. शूटिंग सुरु असताना मंगळवारी सिनेमाच्या सेटवर अचानक आग लागली.
हातात खोरं घेऊन साताऱ्यात अक्षयकुमारचं श्रमदान

फटाके फोडण्याचं दृष्य चित्रीत केलं जात असताना आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अद्यापही दहा दिवसांचं शूटिंग बाकी होतं.

आगीत बहुतांश सेट भस्मसात झाला असून शूटिंग काही काळासाठी थांबल्याची माहिती आहे. सेटची पुनर्निर्मिती करावी लागणार असल्यामुळे वेळ आणि पैशांचा खर्च वाढला आहे, त्यामुळेच निर्माते धास्तावले आहेत.
‘केसरी’च्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत

काहीच दिवसांपूर्वी केसरी चित्रपटाच्या सेटवर एक स्टंट करत असताना अक्षयला दुखापत झाली होती. त्याच्या बरगडी आणि छातीला किरकोळ मार लागला होता. यानंतर अक्षयवर उपचारही करण्यात आले होते. डॉक्टरांनी अक्षयला विश्रांतीचा सल्ला दिला होता.

केसरी हा चित्रपट साराग्रहींच्या लढ्यावर आधारित आहे. अक्षयकुमार सोबत अभिनेत्री परीणिती चोप्रा या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. पुढच्या वर्षी होळीच्या मुहूर्ता केसरी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.