इंदापूर : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी महाराष्ट्रात विविध आंदोलनं केलेली आपण पाहिली आहेत. मात्र, आता तृप्ती देसाई वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. आगामी ‘नवरा पंच बायको सरपंच’ या सिनेमात तृप्ती देसाई अभिनय करणार आहेत.

तृप्ती देसाई अभिनय करणार असलेल्या ‘नवरा पंच बायको सरपंच’ या सिनेमाचं चित्रिकरणही सुरु झाले आहे. या सिनेमात एक महिला सरपंच दारुबंदीसाठी आंदोलन करते. त्या आंदोलनासाठी तृप्ती देसाईंना बोलावलं जातं, असा एक सीन आहे.

या सीनची शूटिंग पुण्यातील इंदापुरात पार पडली. ज्यावेळी सिनेमाच्या शूटिंगसाठी तृप्ती देसाई इंदापुरात आल्या, त्यावेळी त्या इथेही आंदोलनासाठीच आल्या असाव्यात, असे इंदापूरकरांना वाटले. मात्र, सिनेमाच्या शूटिंगसाठी आल्याचे कळताच त्यांच्याभोवती लोकांचा गराडाही वाढला. विशेष म्हणजे शूटिंगमध्ये तृप्ती देसाईंना रिटेकची गरज भासली नाही.

या सिनेमातून दारुबंदीचा संदेश दिला जाणार असल्याने ही भूमिका स्वीकारल्याचे तृप्ती देसाई यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.