TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


'जयेशभाई जोरदार' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहच्या 'जयेशभाई जोरदार' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. जयेशभाई जोरदार या चित्रपटामध्ये रणबीरनं  जयेशभाई ही भूमिका साकारली असून अभिनेता बोमन इराणी यांनी एका गावाच्या सरपंचाची  भूमिका साकारली आहे. अभिनेत्री शालिनी पांडेनं जयेशभाईच्या पत्नीची भूमिका या चित्रपटामध्ये साकारली आहे. 


'द कश्मीर फाइल्स' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज


'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा अनेक दिवस चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 


'शेर शिवराज' शुक्रवारी होणार प्रदर्शित


दिग्पाल लांजेकरांचा 'शेर शिवराज'सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अफजलखानाच्या वधाचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. दैदिप्यमान इतिहासाचे सुवर्णपान 'शेर शिवराज' सिनेमाच्या रुपाने येत्या शुक्रवारी 22 एप्रिलला सिनेमागृहात उलगडताना दिसणार आहे.


26 वर्षांनंतर मंदाकिनी करणार कमबॅक


'राम तेरी गंगा मैली' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मंदाकिनी बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. आता 26 वर्षांनंतर ती पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. लवकरच ती तिचा मुलगा रब्बिल ठाकूरसोबत एका गाण्यात दिसणार आहे. 


मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार अजय देवगण आणि तब्बूची जोडी


बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगामी 'भोला' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अजय देवगणने यासंदर्भात माहिती दिली आहे. 'भोला' सिनेमा 30 मार्च 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'भोला' सिनेमात अजय देवगण तब्बूसोबत दिसणार आहे.


सिंघम गर्ल काजल अग्रवालच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन


दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सिंघम गर्ल काजल अग्रवालने एका मुलाला जन्म दिला आहे. 


किंग खानचा 'डंकी' सिनेमा लवकरच होणार प्रदर्शित


बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आगामी 'डंकी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'FIPRESCI-India'च्या पहिल्या दहा भारतीय सिनेमांच्या यादीत 'गोदावरी'ला मानांकन


भारतीय सिनेप्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'FIPRESCI-India'च्या पहिल्या दहा भारतीय सिनेमांच्या यादीत 'गोदावरी' सिनेमाला मानांकन मिळाले आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. 


करिश्मा कपूरचं बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरचा चाहतावर्ग मोठा आहे. करिश्माच्या आगामी सिनेमाचे नाव 'ब्राउन' असं आहे. 'ब्राउन' हा सिनेमा आहे की वेब सीरिज याबाबत करिश्मानं कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही.


'आई कुठे काय करते' मालिकेतील रूपाली भोसलेला झाली दुखापत


छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रूपाली भोसलेच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. 'आई कुठे काय करते' या मालिकेत रुपाली संजना ही भूमिका साकारते. आता मालिकेच्या शूटिंगदरम्यान रुपाली भोसलेच्या पायाला दुखापत झाली आहे.