मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या टॉयलेट एक प्रेम कथा सिनेमाने भारतासह जगभरात दमदार कमाई केली आहे.


या सिनेमाने भारतात बुधवारपर्यंत 89.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातल्या कमाईचा आकडा मिळून 'टॉयलेट एक प्रेम कथा'ने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

koimoi या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार या सिनेमाने परदेशात चार दिवसांमध्ये 14.59 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानुसार या सिनेमाने एकूण 104.54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दरम्यान परदेशातील कमाईचा बुधवारचा आकडा अद्याप मिळू शकला नाही. बुधवारच्या कमाईसोबत हा आकडा आणखी वाढू शकतो.

भारतात या सिनेमाने शुक्रवारी 13.10 कोटी, शनिवारी 17.10 कोटी, रविवारी 21.25 कोटी, सोमवारी 12 कोटी, मंगळवारी 20 कोटी आणि बुधवारी 6.50 कोटी रुपयांची कमाई केली.

टॉयलेट एक प्रेम कथा हा एक सामाजिक संदेश देणारा सिनेमा आहे. केवळ 18 कोटी रुपये एवढ्या बजेटमध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या या सिनेमाने बजेटचा खर्च अगोदरच वसूल केला आहे. ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ भारतात 3 हजार आणि वर्ल्डवाईड 590 स्क्रीनवर रिलीज झाला आहे.