मुंबई : 'बाहुबली 2' च्या घवघवीत यशानंतर आता प्रभासचा प्रत्येक चाहता त्याच्या आगामी 'साहो' चित्रपटाची वाट पाहत आहे. सिनेमात लीड अॅक्ट्रेस म्हणून श्रद्धा कपूरची निवड निश्चित  झाली असून हैदराबदमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

प्रभासची सध्याची क्रेझ पाहता चित्रपटासाठी तो घेत असलेल्या फीवरही परिणाम झाला आहे. 'साहो' चित्रपटासाठी प्रभासने श्रद्धा कपूरपेक्षा तिप्पट फी आकारली आहे.

वाढत्या वजनामुळे प्रभासच्या 'साहो'तून अनुष्काचा पत्ता...

श्रद्धाला या सिनेमासाठी 9 कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे, जी तिच्या बॉलिवूड फीपेक्षा जास्त आहे. कारण दक्षिण भारतात श्रद्धा कपूरचं नाव मोठं असल्याने तिला एवढी फी मिळाली. पण 'साहो'साठी प्रभासने तब्बल 30 कोटी रुपये फी घेतली आहे.

प्रभासची ही फी 'बाहुबली 2'पेक्षा जास्त आहे. 'बाहुबली 2'साठी त्याने 20-25 कोटी रुपये घेतले होते. 'बाहुबली'सारखा सुपरडुपर हिट सिनेमा दिल्यानंतर प्रभास आंतरराष्ट्रीय स्तरावरचा स्टार बनला आहे. त्यामुळे त्याला एवढी मोठी फी देण्यात आली आहे.

'साहो'एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा असून तामिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं शूटिंग हैदराबाद, अबुधाबी आणि परदेशातील इतर लोकशनवर होणार आहे. सुमारे 150 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटात व्हीएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे.

दरम्यान, या सिनेमासाठी प्रभासने त्याचं वजनही कमी केलं आहे.