Timepass 3 : मराठी सिनेमा ‘टाइमपास’ला कायमच प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. या फ्रँचाईझीमधल्या पहिल्या दोन सिनेमांच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक रवी जाधव यांनी तयार केलेल्या तिसऱ्या सिनेमालाही प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. टाइमपास 3 ला मिळालेल्या यशानंतर ZEE5 हा भारतातील सर्वात मोठा एतद्देशीय आणि बहुभाषिक आशय उपलब्ध करून देणारा ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज  'टाइमपास 3' (Timepass 3) चे प्रीमियर होणार आहे.


या यशस्वी फ्रँचाईझीमधल्या तिसऱ्या सिनेमात प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे मुख्य भूमिकांत आहेत. 36 टक्के मिळवून बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर दगडू (प्रथमेश परब) कॉलेजविश्वात पाऊल टाकतो आणि मग पुढे काय होतं हे या या सिनेमात पाहायला मिळणार आहे. गुंड म्हणून आपला भूतकाळ मागे टाकून नवी सुरुवात करण्याचा दगडूचा निश्चय त्याच्या भोवती असलेल्या लोकांमुळे पणाला लागतो. आपण कधीच बदलणार नाही असं त्याला वाटायला लागतं, मात्र तरीही पुढे जात राहाण्याचं बळ त्याला मिळतं, कारण तो एका गँगस्टरच्या मुलीच्या- पालवीच्या (हृता दुर्गुळे) प्रेमात पडतो. दगडूच्या सुसंस्कृत वागण्यानं पालवी प्रभावित होते, मात्र सगळ्याच चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतात या न्यायाने दगडूचं हा उसना अवतारही संपतो. त्यामुळे दगडू- पालवीच्या नात्यावर काय परिणाम होतो हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. 


सिनेमाविषयी दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले, ‘आम्ही सिनेमाचं शूटिंग सुरू केलं, तेव्हा कोविड-19 ऐन भरात होता. केव्हाही लॉकडाउन होण्याची शक्यता होती. सरकारने केसेस वाढत असल्याने लॉकडाउन होण्याची शक्यता जाहीर केली होती. आम्ही जानेवारी- फेब्रुवारी 2021 मध्ये शूटिंगला सुरुवात केली आणि मार्च 2021 मध्ये शूटिंग पूर्ण केलं. त्यामुळे प्रत्येक दिवशी आम्हाला लॉकडाउन लागण्याचं टेन्शन असायचं. आम्हाला सर्व वैद्यकीय नियमांचं पालन करावं लागायचं. सगळ्यांना मास्क बंधनकारक होता आणि मेक- अप टीमही कायम त्यांच्या किटमध्ये असायची. हे सगळं खूप अवघड होतं, मात्र सर्वांनी खूप सहकार्य केलं. आम्हाला फक्त 50 जणांबरोबरच शूटिंग करता यायचं. जर संख्या वाढली, तर पोलिस यायचे. आमच्यासाठी ते दिवस फार कठीण होते. नियमांमुळे एकंदर टीम खूपच लहान ठेवावी लागत होती. कॉलेजच्या अखेरीस दगडू आणि पालवी भांडत असतात असा एक सीन होता आणि ते दोघं त्यात इतके गुंतून गेले, की शेवटी कोण भांडतंय हे पाहाण्यासाठी पोलिस व्हॅन आत आली. कोविड-19 चे नियम पालन हे आमच्यापुढचं खूप मोठं आव्हान होतं आणि सुदैवानं प्रत्येकानं सहकार्य केलं.’


7.3 आयएमडीबी रेटिंग असलेल्या टाइमपास 3 मध्ये संजय नार्वेकर, भाऊ कदम, वैभव मांगले प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा हास्य आणि रोमान्सची अनुभूती देणारा आहे. तेव्हा सज्ज व्हा, हा धमाल सिनेमा पाहायला 16 सप्टेंबर रोजी फक्त ZEE5वर.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:


Movie Release This Week : 'टाइमपास 3' ते 'एक विलेन रिटर्न्स'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी