बाहुबली चित्रपटाचा पहिला भाग, अर्थात 'बाहुबली : द बिगिनिंग' जुलै 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. विश्वासू कटप्पाने बाहुबलीचा जीव का घेतला, या प्रश्नाचा भुंगा डोक्यात सोडून सिनेमा संपला. पडद्यावर एक सिनेमा संपला, आणि प्रेक्षकांच्या मनात पुढचा सिनेमा सुरु झाला.
अनेक जण सोशल मीडियावर कटप्पाने बाहुबलीला का मारलं, याची उत्तर आपापल्या परीने शोधत होता. मात्र एका तरुणाने लिहिलेलं उत्तर तंतोतंत जुळलं आहे. सुशांत दहल या यूझरने 'क्वोरा'वर लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे ही पोस्ट 18 जुलै 2015 ची आहे.
काय आहे पोस्ट?
अमरेंद्र बाहुबली आणि भल्लालदेव एकाच तरुणीच्या म्हणजे देवसेनाच्या प्रेमात पडतात. मात्र देवसेना अमरेंद्रच्या स्वभाव आणि कर्तृत्वावर भाळून त्याची निवड करते. सिंहासन आणि राजकन्या दोघी हातच्या गेल्याने भल्लालचा तीळपापड होतो. भल्लाल वडिलांच्या साथीने शिवगामीच्या मनात अमरेंद्रविषयी वाईट-साईट भरवतो. शिवगामी कटप्पाला बाहुबलीची हत्या करण्याचे आदेश देते. कटप्पाच्या मनात नसूनही त्याला राणीचा आदेश शिरसावंद्य मानावा लागतो. कटप्पा अमरेंद्रची हत्या करतो. मात्र आपली चूक सुधारण्यासाठी कटप्पा आयुष्यभर वाट पाहतो.
आदेश दिल्यानंतर शिवगामीला भल्लालचा खरा हेतू लक्षात येतो. मात्र तोपर्यंत अमरेंद्रचे प्राण गेलेले असतात. भल्लाल सिंहासनावर विराजमान होण्यासाठी खटाटोप सुरु करतो आणि अमरेंद्रच्या बाळाचा जीव घेण्याचाही प्रयत्नही करतो.
‘बाहुबली 2’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित झाला. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी (देवसेना), रम्या कृष्णन (शिवगामी), राणा डुग्गुबाती (भल्लालदेव), सत्यराज (कटप्पा), तमन्ना भाटिया (अवंतिका) यांच्या भूमिका आहेत. बाहुबली 1 चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता.