पिंपरी-चिंचवड : देवसेना! कुंतलनगरीची राजकन्या, अमरेंद्र बाहुबलीची पत्नी, तिच्या सौंदर्याचं वर्णन करताना चाहते थकत नाहीत. बाहुबलीच्या दुसऱ्या भागात जिच्या आरस्पानी सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ केलं, ती देवसेना पहिल्या भागात मात्र विदारक दिसत होती. तिचं ते रुप चितारलं होतं दोन मराठी हातांनी.



प्रताप बोऱ्हाडे आणि डी एन इरकर... देवसेनेचं उतारवयातलं रुप याच दोन हातांनी रेखाटलं आहे. पण ती देवसेना त्यांच्या हातून रेखाटायला मिळण्यापर्यंतची कहाणीही भन्नाट आहे. दिग्दर्शक राजामौली यांना पहिल्या भागातल्या देवसेनेचा मेकअप आवडला नव्हता. एके दिवशी फोन आला आणि त्यांनी  बोऱ्हाडे आणि इरकरांना बोलावलं.



आम्हाला राजामौली यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या आणि त्याप्रमाणे आम्ही केलं. आम्ही दोघं बाहुबली पहायला बसलो होतो. त्याचवेळी वाटलं ही काहीतरी गडबड आहे. हा मेकअप आपल्याला मिळाला तर? आणि योगायोगाने तो मिळाला, असं ते दोघं सांगतात.



खरं तर या जोडगोळीच्या हातांची जादू उडता पंजाबमध्ये दिसली आहे. सौंदर्याची खाण असलेल्या आलियाला कळकट मळकट दाखवण्याचं आव्हानही या दोघांनीच पेललं. उडता पंजाब असो किंवा बाहुबली, या दोन्ही चित्रपटांमधल्या त्यांच्या कामापेक्षा त्यांचा प्रवास जास्त प्रेरणादायी आहे.

उडता पंजाब चित्रपटातील आलिया भट

प्रताप बोऱ्हाडे हे जुन्नरमधल्या तेजवाडीचे शेतकरी. 1988 साली शेती सोडून पुण्यात टेम्पोचालक झाले. 1992 साली ते 'जाणता राजा' नाटकात काम करु लागले आणि हळूहळू नाटकाच्या रंगपटात ते रमून गेले.

लातूरचे डी. एन. इरकर हे डिप्लोमा झाले आहेत. 1996 साली भोसरी एमआयडीसीत नोकरीला लागले. 2006 साली त्यांची ओळख प्रताप बोराडेंशी झाली आणि 2009 साली दोघांनीही बॉलिवुडमध्ये पाऊल टाकलं.



मर्दानी, उडता पंजाब, बाजीराव मस्तानी अशा फिल्म्स त्यांनी केल्या आहेत. जगप्रसिद्ध इराणी दिग्दर्शक माजिद मजिदीच्या बियॉन्ड द क्लाऊडसाठीही त्यांनी काम केलं आहे.

अभिनेत्यांना रंग लावून स्वतः पडद्यामागे राहणारे हे दोन कलाकार आतापर्यंत प्रसिद्धीपासून दूर होते.पण बाहुबलीचं तेजच इतकं, की त्या तेजाने हे अज्ञात कलाकारही उजळून निघाले.