Purushottam Karandak : पुरुषोत्तम करंडकाच्या (Purushottam Karandak) इतिहासात पहिल्यांदाच करंडक देण्याच्या योग्यतेची एकांकिका आणि अभिनय परीक्षकांना आढळून आलेला नाही. त्यामुळे यंदा स्पर्धेच्या परीक्षकांनी केवळ सांघिक पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना पुरुषोत्तम करंडकचे आयोजक राजेंद्र ठाकूरदेसाई म्हणाले की," पुरुषोत्तम करंडक या करंडकासाठी योग्य एकांकिका नसेल तर तो करंडक द्यायचा नाही. हा या स्पर्धेचा सुरुवातीपासूनचा नियम आहे".
राजेंद्र ठाकूरदेसाई म्हणाले आहेत की,"पुरुषोत्तम करंडकाच्या योग्यतेची एकांकिका नसेल तर करंडक दिला जाणार नाही. हा सुरुवातीपासूनचा नियम आहे. पण 57 वर्षात असं कधी झालं नव्हतं. यंदा प्रथमच हा प्रकार घडला आहे. परीक्षकांच्या मते,"त्यांना पुरुषोत्तम करंडकाच्या दर्जाची एकांकिका मिळालेली नाही. त्यामुळे करंडक न देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचं जे बक्षीस आहे ते आतापर्यंत अनेकदा दिलं गेलेलं नाही.
राजेंद्र ठाकूरदेसाई पुढे म्हणाले," पुरुषोत्तम करंडकाच्या प्राथमिक फेरीत 51 महाविद्यालय सहभागी झाले होते. त्यातून अंतिम फेरीत नऊ एकांकिका निवडल्या गेल्या. गेल्या अनेक वर्षांपासून एकांकिकांच्या दर्जावर परिणाम होत आहे. राजाभाऊंनी कोणत्या उद्देशाने ही स्पर्धा घडवली त्याच्यामागे काही भूमिका होती. ती म्हणजे नाटकाचे मुलभूत घटक लेखन, दिग्दर्शन, अभिनय. तांत्रिक गोष्टी नाटकाला हातभार लावतात. पण त्याच्यावर नाटक अवलंबून नाही. त्याच्याशिवायदेखील करता येतं. आणि हे स्वत: उत्कृष्ट तंत्रज्ञ, नैपथ्यकार आणि प्रकाशयोजनाकार असलेल्या राजाभाऊंचं ठाम मत होतं. त्यामुळे तशापद्धतीने नियम बनवण्यात आले होते.
गेल्या 20 एक वर्षात सातत्याने असं दिसतयं की, लिखानात खूप मोठा खड्डा आहे. विद्यार्थी लेखकांची संख्या एकीकडे वाढत आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण ते विद्यार्थी जे काही लिहित आहेत. ते लिहिल्यानंतर ते नाटक आहे ते या क्षेत्रातले जे कोणी जाणकार जुने लेखक आहेत किंवा जाणकारांशी चर्चा करून, त्यांना लिखान दाखवून त्यांच्यासोबत चर्चा करून चुका दुरुस्त कराव्यात. पण ही मुलं कोणासोबत चर्चाच करत नाहीत. फक्त आपापसात चर्चा करतात. जाणकारांशी चर्चा करत नाहीत. आमचं आहे तेच बरोबर आहे आणि तेच सादर करायचय अशा भूमिकेत ते कुठेतरी आहेत. त्यांची भूमिका पुरुषोत्तमच्या नियमांशी विसंगत आहे.
एकांकिका हे नाटक आहे. पण त्याच्या लिखनावर, दिग्दर्शनावर, सादरीकरणावर मालिका, वेबसीरिज याचा परिणाम जास्त आहे. हे नाटक होत नाही. नाटकासाठी तुम्ही जो विषय निवडलाय सादरीकरणासाठी त्याचा एकसंध परिणाम असला पाहिजे. अशा तुकड्या तुकड्यांमध्ये त्याचा परिणाम मिळणार नाही. याची कुठेही जाणीव यामुलांमध्ये दिसत नाही. पुरुषोत्तचं उत्तेजनार्थ अभिनयाचं पारितोषिक घ्याचं आणि थेट मुंबईला मालिकांसाठी पळायचं. आणि मग मालिकांच्या गराड्यात अडकून पडायचं. यासाठी धावपळ करणारी नवी पिढी आहे.
संबंधित बातम्या