Vishu : 'विशू' (Vishu) सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमातील डायलॉगने कोकणवासींयासह अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.  


अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' हा सिनेमा पाहिल्यावर घडणार आहे. 'विषू' सिनेमा येत्या 8 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'विशू' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शहरात राहून, स्वछंदी, बिनधास्त आयुष्य जगणाऱ्या 'विशू'च्या मनात आपल्या गावाविषयी असलेले प्रेम दिसून येते. स्वतःचे आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगण्याची जबाबदारी असणारा विशू डोक्याने नाही तर मनाने विचार करणारा आहे. मात्र त्याच्या आयुष्यात आरवीच्या येण्याने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. 


मालवणमध्ये शूट करण्याच्या अनुभवाबद्दल गश्मीर महाजनी आणि मृण्मयी गोडबोले म्हणाले,"मालवणमध्ये शूट करताना एक वेगळीच मजा आली. बाजूला इतके निसर्गसौंदर्य असताना काम करण्यातही एक वेगळाच उत्साह असतो. चित्रीकरणासाठी रोज बोटीने बेटावर जाणे, दगदगीचे होते, मात्र त्याचा कधी कंटाळा नाही आला. अनेकदा तांत्रिक अडचणी आल्या परंतु या जादुई बेटावर त्या अतिशय नगण्य वाटल्या. चित्रपट पाहताना प्रेक्षकही या बेटाच्या नक्कीच प्रेमात पडतील".


काँक्रीटच्या जंगलात माणूसपण हरवलेले लोक आणि गावात आजही माणुसकी  जपणारे, मनापासून पाहुणचार करणारे लोक दिसत आहेत. निळाशार समुद्रकिनारा, नारळी पोफळीच्या बागा आणि तिथली डौलदार घरे असे कोकणातील निसर्गसौंदर्य आणि कर्णमधुर वाटणारी मालवणी भाषा 'विशू'सिनेमात पाहायला मिळणार आहे.


संबंधित बातम्या


Jersey New Trailer : शाहिद कपूरच्या 'जर्सी' सिनेमाचा नवा ट्रेलर प्रदर्शित


Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, कुणी कुणी कोरलं पुरस्कारावर नाव? जाणून घ्या...


Rang Majha Vegla : एकीला हवी आई, तर दुसरीला बाबा! मुलींच्या हट्टापायी एकत्र येणार कार्तिक आणि दीपा?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha