The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एकीकडे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे काही मंडळी या सिनेमाचं कौतुक करत आहेत. आता केरळमधील एका मशिदीमध्ये एक हिंदू जोडपं लग्नबंधनात अडकलं आहे. संगीतसम्राट ए.आर. रेहमान (A. R. Rahman) यांनीदेखील हिंदू जोडप्याच्या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


ए. आर. रेहमान यांनी हिंदू जोडप्याच्या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ शेअर (A. R. Rahman Shared Hindu Couple Wedding Video) केला आहे. या व्हिडीओमध्ये हिंदू जोडपं मशिदीमध्ये लग्नबंधनात अडकताना दिसत आहे. ए. आर. रेहमान यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर,"ही पाहा केरळची आणखी एक कहाणी". ए. आर. रेहमान यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"शाब्बास... मानवतेवरचं प्रेम बिनशर्त असलं पाहिजे". 






हिंदू जोडप्याच्या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वधूच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना लग्नाचा खर्च करणं शक्य नव्हतं. मीडिया रिपोर्टनुसार, आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे केरळच्या अलप्पुझा शहरातील एका मशिदीमध्ये या जोडप्याच्या लग्नाची व्यवस्था करण्यात आली आहे. 


'द केरळ स्टोरी' या सिनेमावर टीका होत असताना ए.आर. रेहमान यांनी हिंदू जोडप्याच्या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ शेअर केल्यामुळे आता त्यांनादेखील ट्रोल केलं जात आहे. जोडप्याच्या कृतीचं कौतुक केल्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही या सिनेमावर भाष्य केलं आहे. हा सिनेमा आरएसएसचा अजेंदा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'द केरळ स्टोरी'


'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुदीप्तो सेन यांनी सांभाळली आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सिनेमाची कथा चार महिलांची आहे. ज्यांना मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.


संबंधित बातम्या


The Kerala Story: वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘द केरळ स्टोरी’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपटाला कसा मिळेल प्रतिसाद?