The Family Man Season 3 Updates :   प्राइम व्हिडीओकडून आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर इतरांना तगडी स्पर्धा दिली जात आहे.  काही दिवसांपूर्वीच 'पंचायत'च्या तिसऱ्या सीझनची (Panchayat Season 3) रिलीज डेट जाहीर केल्यानंतर आता 'द फॅमिली मॅन'च्या  (The Family Man) तिसऱ्या सीझनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या सीझनच्या अखेरीस तिसऱ्या सीझनबाबत हिंट देण्यात आली होती. त्यानंतर प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनची उत्सुकता लागली होती. 


'द फॅमिली मॅन' च्या तिसऱ्या सीझनचे चित्रीकरण सुरू झाले आहे.श्रीकांत तिवारी आणि जे.के. तळपदे आता पुन्हा नव्या मिशनवर असणार आहे. वेब सीरिजमधील भारतीय तपास यंत्रणेचे हे गुप्तहेर कोणत्या मिशनवर असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 


मनोज वाजपेयी करणार धमाका


द फॅमिली मॅनचा दुसरा सीझन संपल्यापासून वेब सीरिजचा  फॅन फॉलोइंग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आता सीझन 3 सध्या प्रोडक्शनमध्ये आहे. 240 देशांमध्ये ही वेब सीरिज लाँच होणार असून या सीझनमध्ये मनोज बाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेतून थिरकण्यासाठी सज्ज झाला आहे.






काय असणार द फॅमिली मॅन-3 ची गोष्ट?


द फॅमिली मॅन सीरिजमध्ये मनोज वाजपेयी हा मध्यमवर्गीय व्यक्ती आणि एक दर्जेदार गुप्तहेर झाला आहे. तिसऱ्या सीझनमध्येही मनोज वाजपेयी आणि त्याची टीम देशावर येणाऱ्या संकटाशी दोन हात करणार आहेत. त्याशिवाय, त्याचा कौटुंबिक पातळीवरील संघर्ष सुरू असणार आहे.  द फॅमिली मॅनच्या दोन्ही सीझनमध्ये  वेगवेगळे मुद्दे हाताळण्यात आले होते. पहिल्या भागात काश्मीर, दहशतवादाशी संबंधित मुद्दा होता. तर, दुसऱ्या सीझनमध्ये तामिळनाडू आणि श्रीलंकेतील तामिळ फुटीर चळवळीचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला होता. त्यामुळे तिसऱ्या सीझनमध्ये नेमके काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. 


तिसऱ्या सीझनमध्ये दमदार कलाकार


द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनचे दिग्दर्शन राज आणि डीके करणार आहेत.  पहिल्या सीझनमध्ये असणारे काही कलाकार तिसऱ्या सीझनमध्येही दिसणार आहेत. प्रियामणी, शारिब हाश्मी, अश्लेषा ठाकूर, वेदांत सिन्हा आदी कलाकारांच्या भूमिका दिसणार आहेत. त्याशिवाय, काही नवीन कलाकारही दिसण्याची शक्यता आहे.