The Elephant Whisperers : 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटानं डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म या कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार जिंकला. या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून हत्ती आणि त्याचे केअर टेकर्स यांची गोष्ट मांडण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीने ऑस्कर जिंकल्यानंतर आता तामिळनाडू सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन तामिळनाडू सरकारने हत्तीच्या केअर टेकर्सबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे. 


एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्वीटनुसार, 'तामिळनाडू सरकारने राज्यातील 2 छावण्यांमधील 91 हत्तींच्या केअर टेकर्ससाठी मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 1 लाख रुपयांची घोषणा केली. तसेच माहूत म्हणजेच हत्तींची काळजी घेणाऱ्यांसाठी घरे बांधण्यासाठी 9.1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनामलाई व्याघ्र प्रकल्पातील 'Elephant Camp' विकसित करण्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद तमिळनाडू सरकारकडून करण्यात आली आहे.'






एएनआय या वृत्तसंस्थेच्या एका ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं आहे की, 'कोईम्बतूर चावडी येथे 8 कोटी रुपये खर्च करुन मूलभूत सुविधांसह नवीन एलिफंट कॅम्प (Elephant Camp) बांधण्यात येणार आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी 'द एलिफंट विस्परर्स' या डॉक्युमेंट्रीने ऑस्कर जिंकल्यानंतर ही घोषणा केली आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये मुधुमलाई टायगर रिझर्व्हमधील केअरटेकर जोडपे बोमन आणि बेली यांची कथा दाखवण्यात आली आहे. '






'द एलिफंट विस्परर्स' हा 40 मिनिटांचा माहितीपट प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. एका अनाथ हत्तीला एक जोडपं दत्तक घेतं आणि त्याचा आपल्या मुलाप्रमाणे कसा सांभाळ करतं हे या माहितीपटात दाखवण्यात आलं आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


The Elephant Whisperers : ऑस्कर विजेता 'द एलिफंट विस्परर्स'मधील 'रघु' रातोरात झाला स्टार; जगभरातून भेटायला येतायत लोक!