The Elephant Whisperers : 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या भारतीय माहितीपटाने 'ऑस्कर 2023'मध्ये (Oscars 2023) सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. या सिनेमाचं कथानक एक हत्ती आणि आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या जोडप्याभोवती फिरतं. सिनेमात दाखवण्यात आलेल्या हत्तीचं नाव 'रघू' असं आहे. आता या माहितीपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर पर्यटकांनी रघुला पाहण्यासाठी तामिळनाडूमधील थेप्पाकडू एलिफंट कॅम्पमध्ये (Theppakadu Elephant Camp) गर्दी केली आहे. 


'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर देशासह परदेशातील पर्यटक 'थेप्पाकडू एलिफंट कॅम्प'मध्ये रघुला पाहण्यासाठी येत आहेत. त्यावेळी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत लंडनचे पर्यटक ग्रेस म्हणाले की, "थेप्पाकडू एलिफंट कॅम्पच्या परिसरात काही कारणाने मी आलो होतो आणि याच कॅम्पमध्ये असेल्या हत्तीवर आधारित माहितीपटाला ऑस्कर मिळाल्याचं कळलं. त्यामुळे मी या कॅम्पमध्ये येऊन रघुला भेटलो. हत्ती हा मुळातच माझा आवडता प्राणी आहे. आता रघुला भेटून खूप आनंद झाला आहे. मी खरचं खूप भाग्यवान आहे की, ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर एका दिवसातच मला रघुला भेटता आलं." 






'द एलिफंट विस्परर्स'चं शूटिंग कुठे झालं आहे?


ऑस्कर विजेत्या 'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटाचं शूटिंग तामिळनाडूमधील निलगिरी पर्वतरांगेतील मुदुमलाई व्याघ्न प्रकल्पातील थेप्पाकडू एलिफंट कॅम्पमध्ये झालं आहे. थेप्पाकडू एलिफंट कॅम्प हा आशिया खंडातील सर्वात जुना हत्ती कॅम्प आहे. सध्या या कॅम्पमध्ये 28 हत्ती आहेत. हत्तींना प्रशिक्षण आणि त्यांची काळजी घेण्यासाठी या कॅम्पमध्ये खास लोक कार्यरत आहेत. 'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यासाठी दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस या कॅम्पमध्ये पाच वर्षे राहिली आहे. 


'द एलिफंट विस्परर्स' हा 40 मिनिटांचा माहितीपट प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. एका अनाथ हत्तीला एक जोडपं दत्तक घेतं आणि त्याचा आपल्या मुलाप्रमाणे कसा सांभाळ करतं हे या माहितीपटात दाखवण्यात आलं आहे. हत्तींचं संगोपन आणि संवर्धन यावर भाष्य करणारा हा माहितीपट आहे. 


'द एलिफंट विस्परर्स'च्या शूटिंगला लागलेत पाच वर्षे


'द एलिफंट विस्परर्स' हा फक्त 40 मिनिटांचा माहितीपट असला तरी या माहितीपटाच्या शूटिंगला पाच वर्षे लागली आहेत. या माहितीपटाची दिग्दर्शिका कार्तिकीने बोमन आणि बेली हे जोडपं हत्तीचा सांभाळ कसा करतात हे तब्बल पाच वर्षे जवळून पाहिलं. शूटिंगआधी रघु या हत्तीसोबत तिने जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न केला आहे. 


संबंधित बातम्या


Oscars 2023 : 'ऑस्कर' पुरस्कार जिंकलेला 'The Elephant Whisperers' कुठे पाहू शकता? जाणून घ्या डॉक्युमेंट्रीबद्दल सर्वकाही...