Thane : ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) वतीने आयोजित करण्यात आलेल्या मंगळागौर कार्यक्रमात मिसेस मुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे (Lata Eknath Shinde) उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. ठाणे महानगरपालिका गणेशोत्सव मंडळाने मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला लता शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. 


ठाणे महानगरपालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिकेतील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी मंगळागौर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मिसेस मुख्यमंत्र्यांनी देखील सहभाग घेत महिलांचा उत्साह वाढवला. तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद देखील साधला. 


मंगळागौर कार्यक्रमादरम्यान लता शिंदे म्हणाल्या," घरातील नवरा, मुले आणि इतर कौटुंबिक आपण साऱ्या पार पाडत असतो. मात्र आज या साऱ्या जबाबदाऱ्या  काही वेळासाठी बाजूला सारून थोडा वेळ स्वतः साठी काढून या खेळात सहभागी झालो आहोत. तुम्हा सगळ्या जणींचा उत्साह हा निश्चितच आनंददायी आहे". 


ठाणे महानगरपालिकेतील महिलांनी सादर केलेल्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमातील गाण्यावरील सादरीकरण पाहून त्या खुश झाल्या. आपण बायका खरोखरच भारी असतो आणि तुमचा डान्स पाहून मला त्याची पुन्हा एकदा खात्री पटल्याचे त्यांनी सर्व महिलांना सांगितले. तसेच या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आणि त्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावल्याबद्दल त्यांनी ठाणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेही आभार मानले. 


लता शिंदे यांच्यावर मंगळागौर कार्यक्रमाला माजी उपमहापौर सौ.पल्लवी कदम, माजी नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिलारी, सौ.मिनल पालांडे, श्रीमती वर्षा दिक्षीत, सौ.अनघा कदम यांच्यासह शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारी उपस्थित  झाल्या होत्या.


कोण आहेत लता शिंदे?


लता शिंदे बांधकाम व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण संघर्षात त्यांना पत्नीची मोलाची साथ लाभली आहे. वैयक्तिक आयुष्यात अनेक वादळं येत असताना पत्नी लता शिंदे यांनी एकनाथरावांना खंबीर पाठिंबा दिला. 2000 मध्ये एकनाथ शिंदेंनी दोन लेकरं गमावली. त्या काळातही दोघांनी एकमेकांना हिकमतीने सावरलं.


एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत सुरतमार्गे गुवाहाटी गाठलं. त्या दहा दिवसांच्या काळात लता शिंदेंनी घरच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पाळल्या. दीर्घ संघर्षानंतर शिंदे दाम्पत्याला यशाची चव चाखायला मिळत आहे.


संबंधित बातम्या


CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा अनोखा अंदाज, वाढदिवशी अक्कलकोटच्या अन्नछत्रात सेवेला