हैदराबाद : तेलुगू फिल्म इंड्रस्टीमध्ये करिअर करण्याच्या प्रयत्नात असलेली अभिनेत्री श्री रेड्डीने अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करत चित्रपटसृष्टीतील काळं सत्य समोर आणलं. या अभिनेत्रीने आंदोलनाद्वारे तेलुगू फिल्म इंड्रस्टीमधील कास्टिंग काऊचच्या मुद्द्याला वाचा फोडली.


या अभिनेत्रीने आज सकाळी हैदराबाद फिल्म सिटीमधील तेलुगू फिल्म चेंबर ऑफ कॉमर्समध्ये भररस्त्यात कपडे काढून आपली व्यथा मांडण्यास सुरुवात केली. तिच्या या आंदोलनामुळे अनेकांना धक्का बसला. स्थानिक पोलिसांनी अभिनेत्रीला ताब्यात घेतलं आहे.

"अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी माझं लैंगिक शोषण केलं. तसंच तीन चित्रपटांमध्ये काम करुनही मला मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनचं (एमएए) सदस्यत्व दिलं नाही. सदस्यत्वासाठी अर्ज करुनही मला कार्ड दिलेलं नाही," असा आरोप श्री रेड्डीने केला.

तिच्या आरोपांनुसार, "सिनेमात काम मिळावं यासाठी चित्रसृष्टीतील काही लोकांच्या मागणीवरुन त्यांना काही न्यूड फोटो आणि व्हिडीओही पाठवले. इतकंच नाही तर मला लाईव्ह न्यूड व्हिडीओही करायला सांगितले. मात्र त्यांनी व्हिडीओ पाहिले पण कोणतंही काम दिलं नाही. सिनेमात काम मागणाऱ्या अभिनेत्रींचा अशाचप्रकारे फायदा घेतला जातो," असं श्री रेड्डी म्हणाली.



कास्टिंग काऊचबाबत हैदराबादमधील फिल्म चेंबरने मौन बाळगल्याचा आरोपही श्री रेड्डीने केला आहे. मी स्वत: लैंगिक शोषणाची बळी ठरली आहे, असं म्हणत तिने फिल्म चेंबर ऑफिसच्या बाहेर रस्त्यावर टॉपलेस होऊन आंदोलन केलं. व्हिडीओ कॅमेरा आणि फोटोग्राफर्ससमोर तिने कपडे उतरवले.

"स्वत:ची चीड आणि संताप व्यक्त करण्यासाठी मला हाच मार्ग दिसला. हे निर्माते मुंबई आणि दुसऱ्या शहरांमधून अभिनेत्रींना घेऊन येतात, तर स्थानिक मुलींना चित्रपटात काम देण्याच्या नावावर लैंगिक शोषण केलं जातं," असंही श्री रेड्डी म्हणाली. "जर चित्रपट निर्मात्यांनी स्थानिक कलाकारांना संधी दिली नाही तर मी हा मुद्दा आणखी मोठा बनवेन," असा इशारा तिने दिला.