Tejaswini Pandit : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्री मनोरंजनविश्वासह सामाजिक, राजकीय विषयांवरदेखील आपलं मत मांडत असते. आता तिने ट्वीट करत महाराष्ट्रातल्या (Maharashtra) वाढत्या गुन्हेगारीवर आणि ड्रग्सबद्दल भाष्य केलं आहे.


तेजस्विनी पंडितचं ट्वीट काय? (Tejaswini Pandit Tweet)


अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ट्वीट केलं आहे,"दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्ष सतावत आहेतच… आता सर्रास गोळीबार , खून, ड्रग्ज….? असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता". तेजस्विनीने ट्वीट करत महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवर आणि ड्रग्सबद्दल आवाज उठवला आहे. 






तेजस्विनीला नेटकऱ्यांचा पाठिंबा


तेजस्विनीचं ट्वीट सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. दरम्यान नेटकऱ्यांनी या ट्वीटवर कमेंट करत अभिनेत्रीला पाठिंबा दिला आहे. असं बोलल्यामुळे तुम्ही देशद्रोही व्हाल कंगना आत्याच्या नजरेतून, ड्रग्ज पकडले तर सापडतील, आपल्या महाराष्ट्राला गुजरात्यांची आणि इतर परप्रांतीयांची नजर लागली, तेजस्विनी जी आता तुमच्यावर आरोप होतील, ट्रोल केलं जाईल. पण महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत असू, असेच व्यक्त होत राहा, हा मनोरुग्णाच्या स्वप्नातील नवीन महाराष्ट्र आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.


तेजस्विनी पंडित नेहमीच मोकळेपणाने आपलं मत मांडते. त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण तरीही परखडपणे विविध मुद्द्यांवर आपलं व्यक्त होताना ती दिसते. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सोशल मीडियावरदेखील ती चांगलीच अॅक्टिव्ह आहे. आपल्या सौंदर्याने तिने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. अभिनेत्री असण्यासोबत ती एक निर्माती आणि उद्योजिकादेखील आहे. काही दिवसांपूर्वी तिने 24 तास सुरू असणारं एक सलून सुरू केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत जोडली गेली आहे. आगामी सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. 


तेजस्विनी पंडीत एक अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहेच. पण आता निर्मिती क्षेत्रातही तिने पदार्पण केलं आहे. 'बांबू' हा निर्मिती म्हणून तिचा पहिला सिनेमा आहे. तसेच 'अथांग' या वेबसीरिजची निर्मितीही तिने केली आहे. 'तू ही रे','येरे येरे पैसा','अगं बाई अरेच्चा' आणि 'फॉरेनची पाटलीण' अशा अनेक सिनेमांत तेजस्विनी पंडीतची झलक पाहायला मिळाली आहे.  


संबंधित बातम्या


Tejaswini Pandit : जनता सगळं जाणते, ती मूर्ख नाही; तेजस्विनी पंडितचे सूचक ट्वीट; कोणावर साधला निशाणा?