Sonu Nigam :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगमचे (Sonu Nigam) वडील आगम कुमार निगम यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. मुंबई (Mumbai) पोलिसांनी आता आरोपीला कोल्हापुरातून (Kolhapur) अटक केली. रेहान मुजावर असे आरोपीचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी 70 लाख 70 हजार रुपये जप्त केले आहेत.


सोनू निगमच्या वडिलांनी पोलिसांकडे केली होती तक्रार


निगम यांच्या घरातून 72 लाख रुपयांची चोरी झाली. त्यानंतर सोनू निगमच्या वडिलांनी मुंबईच्या (Mumbai) ओशिवरा पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती. सोनू निगमचे वडील आगम कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रेहान हा सोनू निगमच्या वडिलांच्या घरी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. पण आठ महिन्यांपूर्वी त्याला कामावरुन काढण्यात आले होते. सोनू निगमच्या वडिलांचा त्याच्यावर संशय होता. ओशिवरा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 380, 454 आणि 457 अंतर्गत ओशिवरा पोलीस ठाण्यात रेहान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता पोलिसांनी रेहानला अटक केली आहे. 


आरोपीकडून 70 लाख 70 हजार रुपये जप्त


रेहान मुजावरकडून आता 70 लाख 70 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. सोनूच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, रेहान नामक ड्रायव्हर सोनू निगमच्या वडिलांच्या घरी ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. पण त्याचं काम व्यवस्थित नसल्यानं त्याला काही दिवसांआधीच कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. या ड्रायव्हर रेहाननचं सोनू निगमच्या वडिलांच्या घरी डल्ला मारला.


आपल्या गायनाने सर्वांना वेड लावणाऱ्या सोनू निगमची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोनू हा आपल्या आवाजानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. पण सोनू निगम हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी धक्काबुक्की प्रकरणामुळे तो चर्चेत होता. चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले होते.  सोनू निगमसोबत धक्काबुक्की करण्यात आली होती.


सोनूने गायलेल्या गाण्यांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. त्याच्या संदेसे आते है, तुमसे मिल्के दिलका, दो पल आणि मै अगर कहूं या गाण्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.