नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. सुप्रीम कोर्टाने आज (19 ऑगस्ट) हा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं.
सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास नाही केवळ चौकशी केली होती. सुप्रीम कोर्टच्या या निकालानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या या निकालाला आव्हान देऊ शकतं.
या प्रकरणी 11 ऑगस्टला युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर 13 ऑगस्टपर्यंत सर्व पक्षकारांनी आपापली बाजू लेखी स्वरुपात संक्षिप्तरित्या मांडली होती. मग सुप्रीम कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल दिला.
सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. बिहारच्या पाटण्यात आपल्याविरोधात दाखल झालेला गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा, अशी मागणी करत सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीनेही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
हा अन्यायाविरुद्धचा विजय : बिहारचे पोलीस महासंचालक
बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी मुंबई पोलिसांचा तपास आणि पाटण्याच्या एसपीना क्वॉरन्टाईन करण्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मीडियाशी बोलताना ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निकालाने सिद्ध झालं आहे की, बिहार पोलिसांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. हा अन्यायाविरुद्धचा विजय आहे. मला विश्वास आहे की सुशांतला न्याय मिळेल. आमच्यावर अनेक आरोप झाले. आम्हाला तपास करु दिला नाही. पाटणा पोलीस सर्वकाही कायदेशीररित्या करत होते. बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर टीकाटिप्पणी करण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नाही.
मुंबई पोलिसांना कोणी बोलू दिले नाही? : आशिष शेलार
सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केला आहे. "कुणी, मुंबई पोलिसांना बोलू दिले नाही? "पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही!" "सिंघम" चा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे. पण सुशांत सिंग रजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही? कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक, ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही? पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात, पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का? सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला. याप्रकरणी आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?" असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे.
सत्यमेव जयते : पार्थ पवार
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी अवघ्या दोन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' एवढीच पण सूचक ट्वीट केलं. पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या बोलण्याला कवडचीही किंमत देत नाही, अशा शब्दात फटकारलं होतं.
पार्थ यांनी काय ट्वीट केलं पाहिलं नाही : रोहित पवार
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास सीबीआयच करणार असल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. ते म्हणाले की, सुशांतला न्याय मिळाला पाहिजे. मात्र त्याचवेळी सरकार कोणाचंही असो मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे, असं रोहित पवार म्हणाले. तसंच सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय तपासाच्या निर्णयावर पार्थ पवार यांनी सत्यमेव जयते या शब्दात ट्वीट केलं. याविषयी रोहित पवार म्हणाले की, "पार्थ काय यांनी काय ट्वीट केलं हे पाहिलं नाही. ट्वीटचा अर्थ कोणी कसाही लावू शकतो."
राज्य सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज : देवेंद्र फडणवीस
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास वाढेल. या प्रकरणाची हाताळणी मुंबईत करण्यात आली. यासंदर्भात राज्य सरकारने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. आता हा निर्णय झाल्यावर सीबीआय लवकर चौकशी करेल. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आणि त्यांच्या करोडो चाहत्यांना या माध्यमातून न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर दिली आहे.
CBI Probe in SSR Case | सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करणार