मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलीस तपासात गुंतले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत दोन डझनपेक्षा जास्त अधिक लोकांचा जबाब नोंदवला आहे. त्यामध्ये त्याची कथित गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती, दिग्दर्शक संजय लीला भन्साली, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा तसंच सुशांतच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. आता बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या प्रॉडक्शन बॅनरपैकी असलेल्या यशराज फिल्म्सचे मालक आणि निर्माते आदित्य चोप्रा यांची पोलिसांनी तब्बल चार तास चौकशी करुन जबाब नोंदवला. पोलिसांनी शुक्रवारी सुशांत सिंह राजपूतचा उपचार करणाऱ्या डॉ. केरसी चावडा यांचाही जबाब नोंदवला होता.


सुशांतसोबतच्या कॉन्ट्रॅक्ट आणि चित्रपटांबाबत चौकशी
मीडियाला टाळण्यांसाठी वांद्रे पोलिसांनी आदित्य चोप्रा यांची चौकशी अंधेरीतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये केली. आदित्य चोप्रा सकाळी 9 वाजता वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी चार तास आदित्य चोप्रा यांची कसून चौकशी केली. या चौकशीत 'पानी' चित्रपट आणि यशराज फिल्म्सने सुशांतसोबत झालेल्या करारासंबंधात प्रश्न विचारण्यात आल्याचं समजतं.


सीबीआय तपासाची वाढती मागणी
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यात त्याची कथित गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीनेही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर मुंबई पोलिसांवरील तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचा दबाव वाढला आहे. मात्र महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया दिली होती. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची गरज नाही कारण या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान व्यायसायिक स्पर्धेच्या पैलूचाही विचार केला जाईल, असंही देशमुख म्हणाले होते.


सुशांत सिंह राजपूतने मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी 14 जून रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. सोबतच त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर अनेक कलाकारांनी आपली भूमिका मांडली आहे.


संबंधित बातम्या


सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; रिया चक्रवर्तीची अमित शाहांकडे सीबीआय चौकशीची मागणी


सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सलमान खानची चौकशी होणार?


सुशांत सिंह राजपूत आत्महत्येबाबत संजय लीला भन्साळी यांच्या चौकशीतून काय माहिती मिळाली?


Rhea Chakraborty | सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची सीबीआय चौकशीची मागणी