मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे यांची प्रमुख भूमिका असलेल्या नेटफ्लिक्स ओरिजिनल 'रात अकेली है'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये अनेक कलाकारांचा भरणा आहेच, शिवाय सस्पेन्सचाही तडका आहे. 'रात अकेली है' हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री आहे.
ट्रेलरमध्ये दाखवलं आहे की, " एका खुनाचा तपास जटिल यादव (नवाजुद्दीन सिद्धिकी) करत आहे. पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असलेल्या नवाजच्या रडारवर मृताच्या घरातील सर्वच लोक आहेत, ज्यात राधिका आपटेवरही संशयाची सुई आहे. मृत्यूचा उलगडा करण्याच्या प्रयत्नात असलेला नवाज एका जमीनदाराच्या घरी पोहोचतो. तिथे त्याला समजतं की घरात उपस्थित कुटुंबातील लोक काही ना काही लपवत आहे. हे प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाही, याची जाणीव त्याला होते."
'रात अकेली है'चा ट्रेलर अतिशय दमदार आहे. यात यंत्रणेतील भ्रष्टाचारावरही बोट ठेवण्यात आलं आहे. नेते किंवा मोठे अधिकारी त्याला तपासापासून कसं रोखतात, परिणामी हे प्रकरण उलगडण्यात वेळ लागतोय हे दाखवण्यात आलं.
'रात अकेली है'मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे यांच्यासह श्वेता त्रिपाठी, निशांत दहिया, तिग्मांशु धुलिया आणि अनेक कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.