Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. विनीत जिंदाल यांनी ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाबाबत तक्रार दाखल केली आहे. विनीत जिंदाल म्हणाले की, या चित्रपटाने लष्कराचा अपमान केला असून, हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. विनीत यांनी आमिर खान, चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदन आणि पॅरामाउंट पिक्चर्सविरोधात तक्रार दाखल केली आहे.


अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर म्हणजेच 11 ऑगस्टला ‘लाल सिंह चड्ढा’ रिलीज झाला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाबाबत अनेक वाद निर्माण झाले आहेत. मात्र, आता थेट आमिर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.



‘लाल सिंह चड्ढा’ वादात!


या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा झाल्यापासून तो कोणत्या ना कोणत्या कारणाने विरोधात अडकला आहे. इतकेच नाही तर, तर सोशल मीडियाद्वारे या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. मात्र, आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही हा वाद वाढतच चालला आहे. आता आमिर खानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


एएनआयच्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना दिलेल्या तक्रारीत वकील विनीत जिंदाल यांनी चित्रपटातील काही गोष्टी आक्षेपार्ह असल्याचा आरोप केला आहे, ज्यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 153, 153A, 298 आणि 505 अंतर्गत आमिर खानवर, दिग्दर्शक अद्वैत चंदन आणि पॅरामाउंट पिक्चर्स विरुद्ध एफआयआर नोंदवावा, असे म्हटले गेले आहे.


नेमकं कारण काय?


या चित्रपटात कारगिल युद्धादरम्यान एका मानसिकदृष्ट्या असक्षम व्यक्ती भारतीय सैन्यात भरती होताना दाखवण्यात आले आहे. कारगिल युद्ध लढण्यासाठी अतिशय कठोर प्रशिक्षण घेतलेले सैन्यच पाठवण्यात आले होते. कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतरच सैनिक युद्धावर जातात. परंतु, या चित्रपटातून भारतीय सैन्याचा अपमान करण्यात आला आहे, असे जिंदाल म्हणाले.


हिंदूंच्या भावना दुखावल्या


चित्रपटातील आणखी एका दृश्यावरही वाद निर्माण झाला आहे. एका सीनमध्ये पाकिस्तानी सैनिक म्हणतो की, मी नमाज अदा करतो, तुम्ही का करत नाही? यावर लाल म्हणतात की, ‘माझी आई म्हणते, ही सगळी पूजा मलेरियासारखी आहे. त्यामुळे दंगली होतात.’ या संवादामुळे हिंदूंच्या भावना दुखावणारा हा चित्रपट असल्याचे देखील तक्रारीत म्हटले गेले आहे.


वाचा इतर बातम्या: