Sunny Deol Bobby Deol : बॉलिवूडमध्ये जवळपास पाच दशकांपासून देओल कुटुंबाने सिने रसिकांचे मनोरंजन केले आहे. धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यानंतर त्यांचा मुलगा सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओलने (Bobby Deol) सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. त्यापैकी बॉबी देओलची अभिनयातील पहिली इनिंगही फ्लॉप झाल्यानंतर त्याची दुसरी इनिंग चांगली झोकात सुरू झाली आहे. 'आश्रम' या वेब सीरिजपासून (Web Series) बॉबीच्या करिअरची गाडी सुस्साट धावत आहे. बॉबी देओलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सनी देओलच्या एका वाक्याने बॉबीच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसत आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये येत्या एपिसोडमध्ये आता सनी देओल आणि बॉबी देओल दिसणार आहेत. मागील एपिसोडमध्ये आमिर खानने हजेरी लावली होती. आता, सनी आणि बॉबी देओल कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावणार आहेत.
'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या प्रोमोमध्ये बॉबी देओल आणि सनी देओल यांनी आपल्या स्वॅगसह एन्ट्री केली. प्रोमोमध्ये सनी देओलने मागील काही वर्षांमध्ये देओल कुटुंबीयांना मिळालेल्या चांगल्या दिवसांबद्दल भाष्य केले.
सनी देओलने म्हटले की, 1960 पासून आमचं कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात असल्याचे सांगितले जाते. मात्र, मागील काही वर्ष चांगली गेली नव्हती. पण जेव्हा माझ्या मुलाचे लग्न झाले. त्यानंतर 'गदर 2' प्रदर्शित झाला. त्याआधी वडिलांचा चित्रपट झळकला. विश्वासच वाटत नव्हता की देवाची आमच्यावर कृपा सुरू झाली आहे. त्यानंतर अॅनिमल चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर असं वाटलं की आम्ही आता यश मिळवले आहे.
बॉबीच्या डोळ्यात अश्रू
सनी देओल एका बाजूला हे सगळं सांगत असताना दुसरीकडे बॉबी देओलच्या डोळ्यात अश्रू तरळले. बॉबी देओल आपल्या सेकंड इनिंगमध्ये चांगलाच यशस्वी झाला आहे. ओटीटी पासून ते सिल्वर स्क्रिनवर बॉबीच्या अभिनयाची जादू दिसू लागली आहे. कधीकाळी मिमर्सच्या थट्टेचा विषय असलेल्या बॉबीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा स्थान मिळवले आहे.
सनी देओलने सांगितला धर्मेंद्र बाबतचा किस्सा
सनी देओलने या शो मध्ये वडील धर्मेंद्र यांच्याबाबतचाही किस्सा सांगितला आहे. सनी देओलने सांगितले की, धर्मेंद्र म्हणतात की, माझ्यासोबत बस आणि माझ्या मित्रासारखा हो असे म्हणतात. पण, मी त्यांना म्हणतो की मी तुम्हाला मित्र म्हणून सगळ्या गोष्टी सांगतो तर तुम्ही लगेच वडील होता, यावर एकच हास्यकल्लोळ उडतो.