Sukhwinder Singh on Ram Gopal Varma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी जय हो या गाण्यावरुन एक मोठा खुलासा केला होता. त्यांनी नुकतच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, ऑस्कर विजेतं जय हो हे गाणं ए.आर रेहमानने नाही तर सुखविंदर सिंहने तयार केलं होतं. पण त्यांच्या या दाव्याचं सुखविंदर सिंहनेच (Sukhwinder Singh) खंडन केलं आहे.
राम गोपाल वर्मा यांना काहीतरी चुकीची माहिती मिळाली असल्याचं यावेळी सुखविंदर सिंहने म्हटलं आहे. त्यामुळे सध्या या गाण्याची बरीच चर्चा सुरु झाली. राम गोपाल वर्मा यांच्या या दाव्यानंतर चाहत्यांनाही धक्का बसला होता. पण यावर आता सुखविंदर सिंहने भाष्य केलं आहे.
सुखविंदर सिंहने काय म्हटलं?
सुखविंदर सिंहने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, मी हे गाणं फक्त गायलं आहे, राम गोपाल वर्मा हे नाव छोटं नाही, कदाचित त्यांना काही चुकीची माहिती मिळाली असेल. पण हे गाणं ए.आर. रेहमान यांनीच ते गाणं गायलं होतं.
पडद्यामागे नेमकं काय घडलं होतं?
सुखविंदर सिंहने पुढे बोलताना म्हटलं की, ए.आर रेहमान यांनी हे गाणं युवराज सिनेमासाठी सुभाष घई यांना देखील ऐकवलं होतं. तेव्हा मी ते गायलं नव्हतं. पण त्या चित्रपटासाठी त्यांना कुठेही ते फिट वाटलं नाही, त्यामुळे त्यांनी दुसरं गाणं तयार करायला सांगितलं. त्यावेळी आम्हाला फार वाईट वाटलं, पण त्यावेळी मी गुलजार यांना म्हटलं की, मला हे गाणं गायचं आहे आणि ते मी गायलं. त्यानंतर ए.आर रेहमान यांनी ते गाणं 'स्लमडॉग मिलियनेयर' या चित्रपटांच्या दिग्दर्शकांना ऐकवलं आणि त्यांनी ते त्या चित्रपटात घेतलं.
राम गोपाल वर्मा यांचा दावा काय?
ऑस्कर पुरस्कार मिळवलेल्या जय हो हे गाणं ए.आर रेहमान यांनी तयार केलं नसल्याचा दावा राम गोपाल वर्मा यांनी केलं होता. तसेच हे गाणं सुखविंदर सिंहने तयार केल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं होतं. राम गोपाल वर्मा यांच्यामुळे जय हो या गाण्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. हे गाणं आजही तितकच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतं.