Stepney : धुळे शहरातील मूळचे रहिवासी असणारे तुषार भटुलाल जयस्वाल यांनी दिग्दर्शित केलेला 'स्टेपनी' (Stepney) हा सिनेमा स्टार प्रवाह पिक्चर या वाहिनीवर प्रसारित होणार असून भटुलाल जयस्वाल हे या सिनेमाचे निर्माते असून त्यांचे चिरंजीव तुषार जयस्वाल यांनी या सिनेमात मध्यवर्ती भूमिका निभावली आहे.
10 जुलैला होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
'स्टेपनी' या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार भरत जाधव यांची मुख्य भूमिका असून विजू खोटे, आदिती भागवत, स्वाती चिटणीस, अमिता खोपकर, किशोर नांदलासकर अशा दिग्गज कलावंतांनी या सिनेमात भूमिका साकारल्या असून स्टार प्रवाह पिक्चर या वाहिनीवर (उद्या) रविवारी 10 जुलैला दुपारी एक वाजता 'स्टेपनी' या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.
विनोद म्हटलं की भरत जाधव आणि भरत जाधव म्हटलं की विनोद, असे जणू समीकरणच तयार झाले आहे. हाच मराठी चित्रपटसृष्टीतला विनोदाचा बादशहा आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि तोही एक नवा कोरा विनोदी सिनेमा घेऊन. ‘स्टेपनी’ असे या सिनेमाचे नाव असून भरत जाधव या सिनेमातही विनोदी भूमिका निभावताना दिसणार आहे. या अतरंगी नावावरूनच सिनेमात नक्कीच वेगळे काहीतरी पाहायला मिळणार हे नक्की आहे. आता कोणती ‘स्टेपनी’, कोणाची 'स्टेपनी', अशा सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.
भरत जाधव यांनी यापूर्वीही अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांमधून विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांना पोट धरून हसवले आहे. आता ‘स्टेपनी’ या सिनेमातून भरत जाधव पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये हशा पिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. बऱ्याच दिवसांनी भरत जाधव सिनेमात दिसणार असल्यामुळे धमाल मस्ती तर होणारच.
धुळे शहरातील नेर या छोट्याशा गावातून तुषार जयस्वाल यांनी 'स्टेपनी' या एका दर्जेदार सिनेमाची निर्मिती केली असून समस्त धुळेकरांनी हा सिनेमा आपल्या परिवारासह आपल्या टीव्हीवर बघून प्रोत्साहन द्यावे असे आवाहन निर्माते भटुलाल जयस्वाल व त्यांचे चिरंजीव अभिनेता तुषार जयस्वाल यांनी केले आहे. तुषार जयस्वाल या नावाने त्याचे यू ट्युब चॅनल असुन तेदेखिल लोकप्निय आहे. धुळे तालुक्यातील नेर गावातील ग्रामीण भागातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणाऱ्या तुषार जयस्वाल यांनी आजपर्यंत काही शॉर्ट फिल्म देखील तयार केल्या असून ग्रामीण भागातील कलावंतांच्या कलेला वाव मिळावा यासाठी भविष्यात आपण प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या