R. Madhavan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आर माधवन (R Madhavan)  हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. काही दिवसांपूर्वी आर माधवन यांचा रॉकेट्री: द नंबी इफेक्ट हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत, बालपणाबाबत आणि कोल्हापूरसोबत असणाऱ्या खास नात्याबाबत आर. माधवननं एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमामध्ये सांगितलं. यावेळी आर. माधवननं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि करिअरबाबत काही खास गोष्टी सांगितल्या. 


कोल्हापूरसोबत खास नातं


आर माधवननं सांगितलं की, सुरुवातीचा काही काळ त्यांनी कॅनडामध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर भारतात परत आल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला इंजिनियरिंगचं शिक्षण घेण्यास सांगितलं. शिक्षणाबाबतची आठवण सांगताना आर. माधवन म्हणाला, "कोल्हापूरमधील दिवस हे माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते. कोल्हापूरला येण्याच्या आधी मी कॅनडामध्ये होतो. त्यानंतर मी भारतात इंजिनियरिंगचं शिक्षण घेण्यास आलो. सुरुवातीला माझ्या वडिलांनी सांगितलं की पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज हे खूप चांगलं कॉलेज आहे. त्यामुळे मी आणि माझे वडील कॉलेजची चौकशी करण्यासाठी पुण्याला गेलो. पण नंतर आम्ही दुसरं कॉलेज निवडण्याचा निर्णय घेतला. एका नातेवाईकांनी आम्हाला कोल्हापूरच्या कॉलेजबाबत सांगितलं. नंतर मी कोल्हपूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. माझी बायको देखील कोल्हापूरचीच आहे."


कोल्हापूरमध्ये असताना मित्रांनी केलेल्या मदतीबाबत देखील आर. माधवननं यावेळी सांगितलं. 'त्यावेळी माझे मित्र मला त्यांची बाईक चालवायला देत होते. कॉलेजमध्ये आम्ही खूप धम्माल करत होतो.' असंही माधवन म्हणाला. 


सांगितलं एका अभिनेत्याचं आयुष्य 


'अभिनेत्याचं आयुष्य चांगलं असतं. सेट पाहा, हिरोईन कोण आहे ते पाहा. चेक घ्या. चित्रपट रिलीज होण्याच्या आधी तणावात असल्याची अॅक्टिंग करा आणि पुढच्या चित्रपटाची शूटिंग करा.', असं आर. माधवन यावेळी म्हणाला. 


एकही रुपया न घेता शाहरुख आणि सूर्यानं केलं काम


आर. माधवननं सांगितलं की, शाहरुख आणि सूर्या यांनी मानधन न घेता रॉकेट्री या चित्रपटामध्ये काम केलं. तो म्हणला, 'मी शाहरुखला दिवाळी पार्टीमध्ये भेटलो. त्यावेळी शाहरुखनं रॉकेट्रीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मला वाटलं की तो मजा करत आहे पण नंतर तो मला म्हणाला की, मला पासिंग शॉट देखील चालेल. तू व्यक्त केलेल्या इच्छेबद्दल मी तुझे आभार मानतो. असा मेसेज मी नंतर शाहरुखला केला. पण त्यानंतर मला शाहरुखच्या ऑफिसमधून फोन आला की शाहरुखला या चित्रपटात खरोखरंच काम करायचं आहे. शाहरुखनं या चित्रपटासाठी एकही रुपये मानधन घेतलं नाही. सूर्यानं देखील या चित्रपटासाठी मानधन घेतलं नाही. '


आज रात्री नऊ वाजता एबीपी माझावर तुम्ही अभिनेता आर. माधवनची ही विशेष मुलाखत पाहू शकता.