SS Rajamouli On RRR : 'आरआरआर' (RRR) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला असून हा सिनेमा या वर्षातला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. देशभरात हा सिनेमा सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 900 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती राजामौलींनी (SS Rajamouli) दिली आहे. 


'आरआरआर'च्या दुसऱ्या भागाची घोषणा


'आरआरआर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला. सिनेरसिकांनी या सिनमाचं कौतुक केलं. त्यानंतर प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. अशातच या सिनेमाचे दिग्दर्शक एस एस राजामौलींनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. तसेच या सिनेमावर काम करायला सुरुवात झाली असल्याचं ते म्हणाले. 


'आरआरआर 2'च्या तयारीला सुरुवात


शिकागोत पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान एस एस राजामौलींनी 'आरआरआर 2'वर भाष्य केलं आहे. एस एस राजामौली म्हणाले," माझ्या प्रत्येक सिनेमाचं कथानक, पटकथा लिहिण्यासाठी मला माझ्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली आहे. 'आरआरआर 2'वर सध्या आमचं काम सुरू आहे. तसेच वडील 'आरआरआर 2'च्या कथेवर काम करत आहेत". 


'आरआरआर' या सिनेमात एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते. तर अजय देवगन आणि श्रिया सरनची झलक या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या भागात कोणते कलाकार असतील याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 






'आरआरआर 2' या सिनेमातदेखील प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. तसेच हा सिनेमा बिग बजेट सिनेमा असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सिनेमातील गाण्यांचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 'आरआरआर 2' हा सिनेमा पुढील वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


संबंधित बातम्या


RRR : राजामौलींच्या 'आरआरआर'चा होणार ऑस्करच्या शर्यतीत समावेश; अनुराग कश्यपने दिली माहिती