Joyland Banned In Pakistan : 'जॉयलँड' (Joyland) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाला पाकिस्तानकडून ऑफिशियल एन्ट्री मिळाली होती. अशातच या सिनेमाला पाकिस्तानने बंदी घातली आहे. हा सिनेमा येत्या 18 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता या सिनेमावर पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली आहे.
'जॉयलँड' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सईम सादिक यांनी सांभाळली आहे. 4 नोव्हेंबरला या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला होता. पण आता रिलीजआधीच सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. सिनेमात काही आक्षेपार्ह गोष्टी दाखवण्यात आल्याने पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सिनेमावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
'जॉयलँड' हा सिनेमा कान्स फिल्म फेस्टिव्हलसह अनेक परदेशी फिल्म फेस्टिव्हलसमध्ये दाखवण्यात आला आहे. समीक्षकांनीदेखील या सिनेमाचं कौतुक केलं आहे. 17 ऑगस्ट रोजी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत प्रमाणपत्र दिले होते. पण आता सिनेमाच्या आशयावरून या सिनेमाला विरोध करण्यात आला आहे.
विरोधानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सिनेमावर बंदी घातली आहे. 11 नोव्हेंबर रोजी मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करत म्हटलं होतं,"जॉयलँड' या सिनेमात अत्यंत आक्षेपार्ह मजकूर असल्याच्या लेखी तक्रारी मिळाल्या आहेत. समाजासाठी हे योग्य नाही".
'जॉयलँड' सिनेमाचं कथानक काय?
पितृसत्तेवर भाष्य करणारा 'जॉयलँड' हा सिनेमा आहे. आपल्या आपत्यांना मुलगा व्हावा अशी अपेक्षा असणाऱ्या कुटुंबावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. कुटुंबातील लहान मुलगा गुपचूप इरॉटिक डांन्स थिएटरमध्ये सामील होतो जिथे तो एका ट्रान्सजेंडर महिलेच्या प्रेमात पडतो. यातूनच कुटुंबात मतभेद निर्माण होतात.
'जॉयलँड' या सिनेमात सानिया सईद, अली जुनेजो, अलिना खान, सरवत गिलानी, रस्ती फारूख, सलमान पिरजादा आणि सोहेल समीर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमातील अभिनेत्री सरवत गिलानीने पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे. ट्वीट करत तिने म्हटलं आहे,"हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे. देशाचा अभिमान हिरावून घेऊ नका".
संबंधित बातम्या