Sridevi Death Anniversary : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बॉलीवूडच्या चांदनीने अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलं. श्रीदेवी यांचे चित्रपट असोत, अभिनय असो किंवा फॅशन सेन्स असो, या प्रत्येक गोष्टीची आजही प्रेक्षक वर्गामध्ये तितकीच चर्चा केली जाते. आईच्या आठवणीत श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली त्यांचे फोटो शेअर करत असतात. श्रीदेवी (Sridevi Death Anniversary) यांचे आजच्याच दिवशी म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. त्याच आठवणीत खुशीने आईसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे.
श्रीदेवी यांचे पूर्ण नाव 'श्री अम्मा यंगर अय्यप्पन' असे आहे. त्यांनी हिंदीसह, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेंतील सिनेमांत काम केलं आहे. श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमधील मीनामपट्टी या गावात झाला. श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी 'कंधन करुणई' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर 1972 साली 'रानी मेरा नाम' या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यावेळी त्या नऊ वर्षांच्या होत्या. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं. श्रीदेवी यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं असलं तरी 'हिम्महतवाला' या सिनेमाने त्यांना खरी ओळख मिळाली.
आईच्या आठवणीत लेकीने केला जुना फोटो शेअर
आईच्या आठवणीत खूशीने बहिण जान्हवी आणि आईसोबतचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्रीदेवी यांनी मोरपीसी रंगाची साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच थोडा असा साऊथ इंडियन लूक त्यांचा या फोटोमध्ये दिसतोय. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्याने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूशी आणि जान्हवी कपूर यांच्या बालपणीची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली. या फोटोमुळे श्रीदेवी यांच्या चाहत्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
50 वर्षांत 300 सिनेमे
श्रीदेवी यांनी तीन दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. यादरम्यान त्यांनी 300 पेक्षा अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. 63 हिंदी, 62 तेलुगू, 58 तामिळ आणि 21 मल्याळम सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. बोनी कपूरसोबत लग्न झाल्यानंतर श्रीदेवी सिनेसृष्टीापासून लांब राहिल्या. त्यानंतर 2012 साली 'इंग्लिश विंग्लिश' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी कमबॅक केलं. लग्नानंतर मुख्य भूमिकेत पदार्पण करणाऱ्या श्रीदेवी या पहिल्या अभिनेत्री होत्या.