मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूने बाळाला जन्म दिला. सैफ अली खान आणि करिना कपूरने आपल्या बाळाचं नाव तैमूर अली खान असं ठेवलं आहे. मात्र तैमूर या नावावरुन तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

मात्र  तैमूर या नावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.  तैमूर कोण होता? त्याचं कर्तृत्त्व काय? याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट-

तैमूर

तैमूर द लेम

किंवा

टॅमरलेन

उझबेकिस्तानच्या समरदंकच्या गवताळ प्रदेशात वाढलेला तैमूरचं बालपण संघर्षात गेलं. शेजाऱ्याची शेळी चोरताना त्याला बाण लागला आणि तैमूरला कायमचं अपंगत्व आलं. तेव्हापासून त्याचं नामकरण झालं टॅमरलेन, म्हणजेच लंगडा तैमूर.

मंगोलियाचा क्रूर शासक चंगेज खान जितका क्रूर होता, तितकीच क्रूरता तैमूरमध्ये ठासून भरली होती. उझबेकिस्तानमधल्या समरकंदच्या शासकाचा अंत झाला आणि तैमूरनं 1369 मध्ये त्या राजसत्तेवर कब्जा केला. पण तैमूर तिथेच थांबला नाही.

मध्यपूर्व तैमूरच्या अधिपत्याखाली
आधी तैमूरनं खुरासान, सीस्तान, अफगाणिस्तान, फरस, अजरबैजान, कुर्दिस्तानवर आक्रमण केलं. बगदाद आणि मेसोपोटेमियावरही तैमूरनं सत्ता प्रस्थापित केली. इतकंच नाही, तर जॉर्जिया आणि कॉन्स्टॅटिनोपाल या व्यापारी केंद्रावरही कब्जा मिळवला. म्हणजेच जवळपास मध्यपूर्व तैमूरच्या अधिपत्याखाली होता.
पण पश्चिमेची स्वारी संपवून परतलेल्या तैमूरला पूर्वेचे वारे खुणावत होते. कारण भारतातल्या श्रीमंतीचे किस्से तैमूरनं लहानपणापासून ऐकले होते. तैमूरनं आपल्या नातवाला भारताच्या दिशेने धाडलं आणि 1398 मध्ये स्वतः तैमूर भारताच्या दिशेने चाल करून गेला.

पंजाबमध्ये प्रवेश
हिंदूकुश पर्वतरांगांना ओलांडून मुलतान, लाहोर, इस्लामाबादला लुटत, तैमूरनं सिंधू नदी पार करून पंजाबमध्ये प्रवेश केला आणि सुरु झाली तैमूरच्या क्रौर्याची नवी कहाणी.

40 हजार पायदळ, 10 हजार घोडेस्वार आणि 120 उंटस्वारांची सेना भारतीय शासकांना पायदळी तुडवत होती. दिल्लीत तेव्हा तुघलक साम्राज्य होतं. पण तैमूरनं अवघ्या काही दिवसातच नासिरउद्दीन महमूद तुघलकला पराभूत केलं.

तैमूरच्या हिंस्त्र वृत्तीचा कळस
पुढे पानिपतमध्ये तर तैमूरच्या हिंस्त्र वृत्तीचा कळस झाला. तैमूरनं आपल्या 40 हजार सैनिकांना प्रत्येकी 2 मुंडकी आपल्यासोबत आणण्याचा फतवा काढला. आणि त्यामुळे उत्तर भारतात जणू महाहत्याकांडाला सुरुवात झाली. तैमूरनं कैद केलेल्या 1 लाख हिंदू सैनिकांची तर एकाच दिवशी सामूहिक हत्या केल्याचाही दावा इतिहासकार करतात.



तैमूरनं पळवून आणलेल्या हिंदू स्त्रिया आपल्या सैनिकांच्या हवाली केल्या, जिथे त्या स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. एका दाव्यानुसार तैमूरनं आपल्या कारकीर्दित तब्बल 1 कोटी 70 लाख लोकांचं शिरकाण केलं. ही संख्या जगाच्या तत्कालीन लोकसंख्येच्या तब्बल 5 टक्के इतकी होती.

तैमूरचे वंशज
तैमूरच्या या थैमानाने उत्तर भारतातली जणू मानवी वसाहतच नष्ट झाली. गावं बेचिराख झाली, पीकं नष्ट झाली. संस्कृत्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक पिढ्या व्यापार ठप्प झाले. तैमूर अवघ्या काही दिवसातच परतला. पण त्याचा वंश भारतात वाढीस लागला, तो बाबरच्या रुपाने. पुढे मुघल साम्राज्याचा विस्तार केला, तो याच तैमूरच्या वंशजांनी.

 तैमूर क्रूर असला, तरी कलाकारांबाबत मात्र त्याला आदर होता. म्हणूनच दिल्ली, पंजाब, पानिपतमधल्या कुशल कारागिरांना त्यांना अभय तर दिलंच. शिवाय त्यांना समरकंदला घेऊन जाऊन आपल्या स्मारकाची रचनाही त्याने केली.

तैमूरचा मृत्यू
तैमूर हा चंगेज खानला आपला आदर्श मानत असे. त्यामुळे जे चंगेज खानला जमलं नाही, ते तैमूरला करून दाखवायचं होतं. ऑटोमन साम्राज्यालाही धूळ चाळणाऱ्या तैमूरला महाकाय चीनवर कब्जा करायचा होता. पण त्याआधीच 1405 मध्ये चंगेज खान प्रमाणेच तैमूरही आजारी पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या एका सामान्य मुलानं कोणत्याही पाठिंब्याविना जगातल्या सर्वशक्तीशाली साम्राज्यांपैकी एक साम्राज्य निर्माण केलं, पसरवलं आणि टिकवलंही. या जमान्यात त्याला क्रूरकर्मा, अत्याचारी, हिंस्त्र अशी विशेषणं लागणं स्वाभाविक आहे. पण त्या काळात तो त्याच्या प्रजेसाठी पराक्रमीच होता.