मुंबई : संजय दत्त आणि सलमान खान या बॉलिवूडमधल्या दोन अभिनेत्यांची घट्ट मैत्री सर्वश्रुत आहे. करिअरच्या सुरुवातीपासूनच दोघांची मैत्री कायम आहे. संजय तुरुंगात गेल्यावर सलमान हळवाही झाला होता, मात्र संजय दत्तने सलमान 'उद्धट' असल्याचं म्हटल्याने इतक्या वर्षांच्या मैत्रीत कटुता निर्माण झाल्याची चिन्हं आहेत.
बॉलिवूडमध्ये कोणीच कोणाचा कायम मित्र नसतो, आणि कायम शत्रू नसतो, असं म्हटलं जातं. सलमान-संजय सारखी मोजकी उदाहरणं वगळता अनेक सेलिब्रेटी मित्र-मैत्रिणींमध्ये गेल्या काही वर्षात विस्तवही जात नसल्याचं पाहायला मिळालं. आता त्यात दोघांची भर पडत्ये की काय, अशी भीती चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
नुकत्याच एका पार्टीमध्ये 'वर्ड असोसिएशन गेम' खेळला गेला. रॅपिड फायर राऊंडमध्ये सलमानला एखादा शब्द सुचवण्याची वेळ संजयवर आली तेव्हा त्याने बिनदिक्कतपणे 'अॅरोगंट' असं म्हटलं. संजय दत्त आणि सलमान खान यांनी 1991 मध्ये साजन हा पहिला चित्रपट एकत्र केला होता. त्यानंतर दस, चल मेरे भाई, ये है जलवा, रेडी, सन ऑफ सरदार यारखे चित्रपट एकत्र केले आहेत.
एकीकडे संजय दत्त जेलमधून बाहेर आला की जंगी पार्टी करणार असं सलमान म्हणाला होता. मात्र फेब्रुवारीत संजूबाबा जेलमधून बाहेर आल्यापासून म्हणजे जवळपास दहा महिन्यांत सलमान संजयला भेटलाही नसल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे दोघांमधली दरी वाढल्याचं चित्र आहे.