मुंबई : लॉकडाऊन काळात थिएटर्स बंद झाली. थिएटर लॉबीला वाटलं काही महिन्यांनी थिएटर्स उघडतील. पण हा काळ खूप पुढे पुढे जाऊ लागला. तसा सिनेनिर्मात्यांनी ओटीटीचा प्लॅटफॉर्म जवळ केला. यावर थिएटर लॉबी नाराज झाली. त्यांचं म्हणणं होतं, इतके दिवस आम्ही तुमचे सिनेमे रिलीज केले. पण आता दिवस वाईट आहेत तर तुम्ही ओटीटीला का जवळ करता? अनेकांनी ओटीटीचं समर्थन केलं. पण दोन सिनेमे मात्र म्हणाले आम्ही थिएटरवरच रिलीज करू सिनेमा. हे दोन सिनेमे होते सूर्यवंशी आणि 83. या दोन सिनेमांनी थिएटरवर रिलीज व्हायची हमी दिल्यावर थिएटरवाले निश्चिंत झाले. पण आता मात्र जरा चिंतेचं वातावरण थिएटरवाल्यांमध्ये पसरलं आहे.


सूर्यंवशी आणि 83 हे दोन्ही सिनेमे थिएटरवर न येता ओटीटीवर येऊ शकतात. रिलायन्स एंटरटेन्मेंटच्या गोटातून याची चाचपणी सुरू झाली आहे. थिएटर्स जर दिवाळी किंवा जास्तीत जास्त नाताळपर्यंत उघडण्याची शक्यता दिसेनाशी झाली तर मात्र हे दोन्ही सिनेमे ओटीटीवर येण्याची शक्यता आहे. या दोन्ही सिनेमांबद्दल कमालीची उत्सुकता आहे, त्यामुळे ओटीटी वाल्यांनीही मोठी ऑफर या सिनेमांसमोर ठेवली आहे. पण येत्या काही दिवसांत थिएटर्स दिवाळीत उघडणार की नाही ते कळल्यानंतर पुढची पावलं उचलली जाणार आहेत. रिलायन्स एंटरटेन्मेंटचे सुभाशीष सरकार यांनीही बोलताना याचं सुतेवाच केलं आहे. दिवाळी, नाताळपर्यंत थिएटर उघडत नसतील तर हे सिनेमे ओटीटीवर यायची शक्यता आहे, असं ते म्हणतात.


सूर्यवंशी या चित्रपटात अक्षयकुमारची भूमिका असून, रोहित शेट्टीचा सिम्बानंतरचा हा चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंगही असल्याचं त्याच्या प्रोमोमधून कळतं. त्यामुळे सिनेप्रेमींचं या सिनेमावर लक्ष आहे. तर दुसरीकडे 83 हा चित्रपट भारताने जिंकलेल्या वर्ल्डकपवर बेतला असल्याने त्याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. त्यात रणवीर सिंगची मुख्य भूमिका असून, दिपिका पडुकोण, आदिनाथ कोठारे, चिराग पाटील यांच्याही भूमिका आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :