मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर सीबीआयने आपल्या तपासाला सुरुवात केली आहे. सीबीआयची 16 सदस्यांची टीम या प्रकरणाच्या तपासात गुंतली आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासाची सर्व कागदपत्रे सीबीआयला सोपवली आहेत. याशिवाय सुशांतचा लॅपटॉप, मोबाईल आणि डायरीही सीबीआयने ताब्यात घेतली आहे.


दरम्यान रिया चक्रवर्ती ईडीनंतर आता सीबीआयच्या रडारवर आहे. ती या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. सीबीआयची टीम कधीही रियाला समन्स बजावू शकते.


सीबीआयच्या पथकाची वांद्र्याच्या डीसीपीसोबत भेट
सीबीआयच्या विशेष तपास पथकाने वांद्र्याचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली. प्रोटोकॉलनुसार सुशांत प्रकरणाच्या तपासाबाबत त्यांची बातचीत झाली. सीबीआयने या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंतची सर्व माहिती, फॉरेन्सिक पुरावे, शवविच्छेदन अहवाल, नोंदवलेले जबाब ताब्यात घेतले आहेत.


सुशांतच्या आचाऱ्याची चौकशी
सुशांत सिंह प्रकरणात सीबीआयने वेगाने तपासाला सुरुवात केली आहे. सीबीआय सुशांतचा आचारी नीरज याची चौकशी करणार आहे. नीरज सांगितलं होतं की, मृत्यूच्या दिवशी त्याने सुशांतला ज्यूस दिला होता. शिवाय सुशांत दरवाजा उघडन नसल्याचंही त्यानेच सांगितलं होतं. मुंबई आणि बिहार दोन्ही पोलिसांनी नीरजची चौकशी केली होती. डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये सीबीआयची टीम त्याची चौकशी करुन जबाब नोंदवणार आहे. या प्रकरणात दोन डीसीपींचीही चौकशी होणार आहे.


बँक अधिकाऱ्यांची चौकशी करणार
सुशांतचं खातं ज्या बँकेत होतं, त्या बँकेच्या अधिकाऱ्यांची सीबीआय आज चौकशी करण्याची शक्यता आहे.


सुशांतच्या घरात जाऊन पुन्हा नमुने घेणार
सीबीआयचं विशेष पथक मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस क्राईम सीन इन्व्हेस्टिगेट करु शकतं. एक टीम आज सुशांतच्या वांद्र्यातील घरात जाणार आहे. पुढील काही दिवासत विशेष पथक फॉरेन्सिक एक्स्पर्टसह अटॉप्सी रिपोर्ट, क्राईम सीन, फोटोग्राफ, व्हिडीओची तपासणी करणार आहे. क्राईम सीन तपासल्यानंतर फॉरेन्सिक टीम दिल्लीत जाऊन सीएफएसएलमध्ये नमुन्यांची तपासणी करेल. सीबीआयच्या विशेष पथकासोबत जे फॉरेन्सिक एक्स्पर्ट आले आहेत, त्यामध्ये फोटो एक्सपर्ट आणि सायन्टिफिक अँड डिव्हिजन सीएफएसएल दिल्ली यूनिटमधून आहेत. उर्वरित फॉरेन्सिक एक्स्पर्ट टेक्निकल फोरेन्सिक एक्स्पर्ट सीएफएसएल दिल्ली यूनिटमधून आहेत. एसआयटी क्राईम सीन, फोटोग्राफ, व्हिडीओ, अटॉप्सी, रिक्रिएशनसह मुंबई पोलिसांनी जे नमुने घेतले आहे, त्यांची पुन्हा तपासणी करणार आहे.