Sonali Phogat : भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगट (Sonali Phogat) हत्याप्रकरणात कर्लिज हॉटेलचा मलिक एडविन न्यून्स आणि ड्रग्ज विक्रेता दत्ताप्रसाद गावकर यांना अंजुना पोलिसांनी अटक करून दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. या दोघांशिवाय रामा मांद्रेकर नावाच्या ड्रग्स पेडलरला देखील अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रामा मांद्रेकर हा दत्ताप्रसाद गावकरला ड्रग्ज पुरवायचा. दत्ताप्रसाद गावकर हा द ग्रँड लिओनीमध्ये वेटरचं काम करायचा. तो येथील लोकांना ड्रग्स देऊन कर्लिज नाईट क्लबमध्ये पाठवायचं काम करत होता. कर्लिज क्लबचा मालक एडविन आणि ड्रग पॅडलर दत्ताप्रसाद यांचे संबंध व्यावहारिक होते म्हणजेच दोन्ही आरोपी व्यावसायिक व्यवहारासाठी एकमेकांशी संपर्क साधत होते, असे तपास केल्यानंतर गोवा पोलिसांना समजले.
दत्ताप्रसाद हा लिओनी रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या लोकांना कर्लिज क्लबमध्ये जाण्यासाठी सुचवत असे आणि तो त्या लोकांना ड्रग्ज देखील पुरवायचा. दत्ताप्रसाद हा वेटरचं काम करायचा पण त्याचे खरे काम ड्रग्स लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करायचा.
उत्तर गोव्यातील अंजुना बीच परिसरातील 200 हन अधिक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सच्या मालकांच्या संपर्कात दत्ताप्रसाद गावकर आणि त्याचा ड्रग्ज कार्टेल होता. जे पर्यटक गोव्याला सुट्टीसाठी आलेले असतात त्या लोकांना टार्गेट करुन त्यांना दत्ताप्रसाद गावकर ड्रग्स देत असत. गोवा पोलिसांनी कर्लिज क्लबचा मालक एडविन आणि दत्ताप्रसाद यांच्या विरोधात एनडीपीएसचा गुन्हा दाखल केला आहे. सोनाली फोगट यांच्या हत्येप्रकरणी गोवा पोलीस हे सध्या दत्ताप्रसाद आणि एडविन यांची चौकशी करत आहेत.
सोनाली हत्येप्रकरणानंतर गोवा पोलीस अॅक्शन मोडवर
सोनाली फोगाट यांच्या हत्येनंतर गोवा पोलिसांनी ड्रग्ज सिंडिकेटविरोधात कारवाई सुरू केली आहे. गोवा पोलिसांनी कलंगुट आणि हरफडे सागरी परिसरात छापे टाकून 19 लाखांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील रहिवासी आणि दक्षिण आफ्रिकेतील ड्रग पॅडलरला अटक करण्यात आली आहे. गोव्यातील मापुसा न्यायालयाने आरोपी सुधीर सांगवान (Sudhir Sangwan) आणि सुखविंदर सिंहला (Sukhwinder Singh) 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: