After Operation London Cafe : कलाकार नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेच्या शोधात असतात. त्यात मराठी सिनेमात एखाद्या अभिनेत्रीला आव्हानात्मक भूमिका करायला मिळणं म्हणजे स्वप्नपूर्ती असते. अभिनेत्री शिवानी सुर्वेनेही साचेबद्ध भूमिकेत अडकून न राहाता, नवीन आव्हान स्वीकारले आहे.
दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे या पॅन इंडिया सिनेमामध्ये शिवानी सुर्वेच्या अॅक्शन अंदाजातले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. शिवानीचा आज वाढदिवस (२८ ऑगस्ट) त्या निमित्ताने तिचे हो पोस्टर काढण्यात आले आहे. युनिफॉर्म, हातात बंदूक आणि डोळ्यात राग अशा रुपात शिवानीला आत्तापर्यंत पाहिले नसेल.
शिवानी सुर्वेने मालिका आणि सिनेमातील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गोड, सुंदर चेहरा आणि गर्ल नेक्स डोअर अशा भूमिकेत शिवानीला आत्तापर्यंत पाहिले आहेत. त्याच्या एकदम विरोधाभास असलेला असा हा तिचा लूक आहे. याबद्दल शिवानी सांगते, “आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा माझ्यासाठी खूप महत्वाचा सिनेमा आहे. आम्हाला हा लूक करताना खूप मजा आली. खरतर स्वतःला या गणवेशात पाहणं सुरुवातीला वेगळं वाटत होतं आणि याची सवय होण्यासाठी मला एक दिवस गेला . माझ्यासाठी हा निर्णय धाडसी होता. आपल्याकडे साधारणपणे नायिकेला सुंदर दाखवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण या भूमिकेची गरज अशी होती. की आम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार न करता, हा लूक ठरवावा लागला होता. एखाद्या कलाकाराला खूप वर्षे लागतात चांगली भूमिका मिळवण्यासाठी आणि मी म्हणेन की माझ्यासाठी हा बेस्टेस्ट रोल आहे. मी या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. या भूमिकेच्या मुळापाशी जाऊन मी काम केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांसमोर हा लूक घेऊन येताना खूप आनंद होतो आहे.”
आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा सिनेमा मराठी - कन्नडा भाषेत चित्रीत करण्यात आला आहे. तर हिंदी, तेलुगु, मल्याळम, तमिळ या भाषेतही सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सदागरा राघवेंद्र यांनी केले आहे. या सिनेमात मराठी - कन्नडा कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्र दिसून येणार आहे. मराठी सिनेमात एक्शन - रोमँटिक सिनेमा कमी येतात, त्यात हा सिनेमा वेगळा ठरणार आहे. दीपक राणेंसोबत या सिनेमाची निर्मीती विजय कुमार शेट्टी आणि रमेश कोठारी यांनी केली आहे. हा सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: