'सोशल मीडियाचा वापर सर्वांनी जबाबदारीने करावा, असं नम्र आवाहन आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पसरवू नका. अफवा ज्या व्यक्तीशी निगडीत आहेत, त्यांच्या भावना विनाकारण दुखवू नका. धन्यवाद' असं ट्वीट गोल्डी बहल यांनी केलं आहे.
मुलींबाबत बेताल वक्तव्य केल्यानंतर राम कदम यांनी आणखी एक चूक केली. अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं निधन झाल्याची अफवा त्यांनी ट्वीट केली. त्यानंतर सोशल मीडियावर राम कदमांची खिल्ली उडवली जात होती.
राम कदम यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक ट्वीट करण्यात आलं. "हिंदी व मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री आणि एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड.. त्यांचे अमेरिका येथे निधन झाले आहे...भावपूर्ण श्रद्धांजली," असं हे ट्वीट होतं, जी खरं तर निव्वळ एक अफवा होती.
ही अफवा असल्याचं समजल्यानंतर दहा मिनिटांतच राम कदम यांनी पहिलं ट्वीट डिलीट केलं. मात्र तोपर्यंत अनेक जणांनी त्याचे स्क्रीनशॉट काढले होते. "सोनाली बेंद्रे यांच्या निधनाची अफवा होती. गेल्या दोन दिवसांपासून ती अफवा पसरत होती. मी त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करतो," असं राम कदमांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं.
सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाला आहे. हायग्रेड कॅन्सरचा साधा अर्थ वेगाने पसरणारा कॅन्सर. सध्या ती अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे.