मुंबई : पन्नाशीनंतर एखादी व्यक्ती निवृत्तीचा विचार करायला लागते. मात्र वयाच्या 20 व्या वर्षी ज्या उत्साहात काम केलं, तितक्याच जोशाने 51 व्या वर्षी काम करणारी व्यक्ती क्वचितच तुम्ही पाहिली असेल. असा एक कलाकार आपल्या बॉलिवूडला मिळाला आहे, त्याचं नाव आहे 'खिलाडी' अक्षय कुमार. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची सांगड घालतानाच सामाजिक भान जपणारा हा अभिनेता 52 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
अक्षय कुमारने जसं यश मिळवलं, तसंच त्याला करिअरमध्ये अनेक चढउतारही सहन करावे लागले. कधी अॅक्शन, कधी कॉमेडी, तर कधी रोमँटिक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली.
अक्षय कुमार बॉलिवूडचा खिलाडी कसा झाला?
5 जून 1992 रोजी खिलाडी हा सिनेमा रिलीज झाला. दीपक तिजोरी या सिनेमात अक्षय कुमारसोबत सहकलाकार म्हणून होता. नव्वदच्या दशकात अक्षय कुमारने अनेक सिनेमे केले. मात्र खिलाडी या टायटलचे सिनेमे प्रक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. 1994 साली अक्षय कुमारचे बारा सिनेमे रिलीज झाले. मात्र यामध्ये 'मै खिलाडी, तू अनाडी' हा सिनेमा सर्वाधिक यशस्वी ठरला. तेव्हापासूनच खिलाडी हा टॅग अक्षय कुमारच्या नावासमोर लागला आणि निर्मात्यांमध्येही याच टॅगसह सिनेमे करण्यासाठी चढाओढ सुरु झाली.
1995 साली सबसे बडा खिलाडी हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवलं. त्यानंतर खिलाडी या टायटलचा सिनेमा हमखास यश मिळवतोच अशी धारणा झाली. त्यानंतर 1996 साली अक्षय कुमारचा खिलाडीयो का खिलाडी हा सिनेमा रिलीज झाला. अभिनेत्री रेखा आणि रवीना टंडन या सिनेमात मुख्य भूमिकेत होत्या. रेखा आणि अक्षय कुमार यांच्यातील बोल्ड दृष्यांनी त्या काळी खळबळ माजवली. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमार जखमीही झाला होता. त्याच्यावर अमेरिकेत उपचार करण्यात आले.
बॉक्स ऑफिसवर खिलाडीयो का खिलाडी यशस्वी झाल्यानंतर 1997 साली मिस्टर अँड मिसेस खिलाडी हा सिनेमा आला. ज्यामध्ये अक्षय कुमारसोबत अभिनेत्री जुही चावला मुख्य भूमिकेत होती. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी करु शकला नाही. तरीही निर्मात्यांचा खिलाडी या टॅगवरील विश्वास कमी झाला नाही.
दिग्दर्शक उमेश मेहरा यांनी 1999 साली अक्षय कुमारला इंटरनॅशनल खिलाडी बनवून पडद्यावर आणलं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली. ट्विंटकल खन्ना या सिनेमात अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत होती. यानंतर 2000 साली अक्षय कुमारचा खिलाडी 420 हा सिनेमा रिलीज झाला. ज्यामध्ये त्याच्या अॅक्शन स्टंटचं जोरदार कौतुक करण्यात आलं.
'खिलाडी 420' नंतर अक्षय कुमारच्या खिलाडी सीरिजने जवळपास 12 वर्षांसाठी ब्रेक घेतला. 2012 साली खिलाडी 786 हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली. 2012 साली खिलाडी सीरिजने 20 वर्षही पूर्ण केले. अक्षय कुमारच्या करिअरमध्ये खिलाडी सीरिजचं योगदान सर्वात मोठं आहे.
एका वर्षात चारपेक्षा जास्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणारा अक्षय एकमेव अभिनेता असेल. मात्र चार पाच नव्हे, तर तब्बल बारा सिनेमे एका वर्षात करण्याचा विक्रम अक्षय कुमारने केलेला आहे.
एका वर्षात 12 सिनेमे
अक्षय कमारने करिअरची सुरुवात सौगंध या सिनेमातून केली. मात्र त्याची खरी ओळख खिलाडी या सिनेमातून निर्माण झाली. अक्षय कुमारचे गेल्या अनेक वर्षांपासून किमान चार तरी सिनेमे एका वर्षात रिलीज होतात. मात्र हा खिलाडी एका वर्षात बारा सिनेमे करायचा यावर कुणालाही विश्वास बसणार नाही.
अक्षय कुमारने 1994 साली तब्बल बारा सिनेमे केले होते. ऐलान हा 1994 मधील त्याचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर ये दिल्लगी, जय किशन, मोहरा, मै खिलाडी, तू अनाडी, इक्के पे इक्का, अमानत, सुहाग, नजर के सामने, जख्मी दिल, जालीम, हम है बेमिसाल आणि पांडव अशी बारा सिनेमे या वर्षात रिलीज झाले होते.