मुंबई : सिनेमातील दृष्यांवर कात्री लावणारं सेन्सॉर बोर्ड आता लवकरच एक नवीन निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सिगारेट आणि दारु पितानाची दृष्य सिनेमातून कायमचे हद्दपार करण्याच्या तयारीत सेन्सॉर बोर्ड असल्याची माहिती आहे.


सिनेमात नाहरकत प्रमाणत्राशिवाय मोबाईल नंबर वापरण्यावरही बंदी घातली जाणार आहे. धुम्रपान करु नये, हे एकमेव वाक्य सिनेमात दाखवणं पुरेसं नाही. अभिनेत्यांना लाखो लोक फॉलो करतात, त्यांनी समाजात एक उदाहरण निर्माण केलं पाहिजे आणि शक्य होईल तेवढे असे सीन टाळले पाहिजेत, असं सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी म्हटलं आहे.

एखाद्या सिनेमात दारुची दृष्य फारच गरजेची असतील, तर त्या सिनेमाला अ श्रेणी प्रमाणपत्र देण्यात येईल, असंही निहलानी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे निहलानी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या निशाण्यावर आले आहेत. दारुची दृष्य दाखवल्यामुळे अ श्रेणी प्रमाणपत्र देणं चुकीचं असल्याचं अनेकांचं मत आहे.

पहलाज निहलानी यांची लवकरच हकालपट्टी?

दरम्यान एका वृत्तानुसार नेहमीच त्यांच्या वक्तव्यांनी वादात असणारे पहलाज निहलानी यांची लवकरच हकालपट्टी केली जाण्याची शक्यता आहे. 28 जुलैला सेन्सॉर बोर्डाच्या सर्व सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे, ज्यामध्ये पहलाज निहलानी यांची सुट्टी केली जाऊ शकते, आणि त्यांच्या जागी प्रकाश झा किंवा चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्याकडे सेन्सॉर बोर्डाची धुरा दिली जाऊ शकते, असं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.