मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषालने सिंगापूर एअरलाईन्सविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. विमानात सोबत वाद्य नेऊ न दिल्याबद्दल श्रेयाने ट्विटरवरुन संताप व्यक्त केला. श्रेया घोषालचा पारा फारसा कधी चढत नाही, मात्र सुरेल आग आळवणाऱ्या श्रेयाने राग व्यक्त केल्याबद्दल तिच्या चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.

'एखाद्या वादक किंवा अमूल्य वाद्य बाळगणाऱ्या कलाकाराने आपल्या विमानाने प्रवास करावा, अशी सिंगापूर एअरलाईन्सची इच्छा नसावी. ठीक आहे. धन्यवाद. धडा मिळाला' असा उपहासात्मक ट्वीट श्रेयाने काल पोस्ट केला होता. श्रेयाच्या ट्वीटनंतर तिच्या चाहत्यांनी संताप व्यक्ते केला. त्यामुळे तात्काळ सिंगापूर एअरलाईननेही तिला रिप्लाय करुन माफी मागितली.


'हाय श्रेया, आम्हाला ऐकून खेद वाटला. आम्हाला तुझ्या तक्रारीबाबत आणखी तपशील मिळू शकेल का? आमच्या सहकाऱ्यांनी तुला काय सल्ला दिला? धन्यवाद' असं ट्वीट सिंगापूर एअरलाईनने केलं.


श्रेया घोषाल सहसा सोशल मीडियावरुन फारशी व्यक्त होत नाही. त्यामुळे विमान कंपनीकडून तिला अत्यंत तापदायक अनुभव आला असावा, अशा भावना ट्विटराईट्सनी व्यक्त केल्या.

श्रेया घोषालने हिंदीसोबतच मराठी आणि दाक्षिणात्य भाषेतही गाणी गायली आहेत. नुकतंच तिने 'कलंक' चित्रपटात गायलेलं 'घर मोरे परदेसिया' हे गाणं चांगलंच गाजलं होतं.