Singer Javed Ali Struggle Story : सिनेसृष्टीत अनेक कलाकारांच्या आपआपला स्ट्रगल आहे. काहींना लवकर यश मिळते. तर, काहींना उशिराने संधी मिळते. काहींचे आयुष्य तर स्ट्रगलमध्येच जाते. अशीच एक गोष्ट एका गायकाची आहे. या गायकाने आपल्या आवाजाची भुरळ प्रत्येकावर पाडली आहे. या गायकाकडे कधीकाळी घरभाडे तर सोडा दोन वेळच्या खाण्याचेही पैसे नसायचे. मात्र, आज या गायकाने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. 


'अर्जियां', 'तू ही हकीकत', 'गुजारिश' आणि 'श्रीवल्ली' सारख्या सुपरहिट गाण्यांना आपला आवाज देणारा गायक जावेद अली (Javed Ali) हा इंडस्ट्रीतील सर्वोत्तम गायकांपैकी एक आहे. ज्यांनी अनेक गाणी गायली आणि स्वतःची खास ओळख निर्माण केली. 


जावेद अलीची कौटुंबिक पार्श्वभूमी 


5 जुलै 1982 रोजी दिल्लीत जन्म झालेल्या जावेद अलीला हा एका सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी होती. दिल्लीतच त्याचे शिक्षण झाले.  जावेद अलीला सुरुवातीपासून गायक व्हायचे होते. त्याचा ओढा गायकीकडे होता. त्याने आपले वडील  उस्ताद हामिद हुसैन यांच्यासोबत कव्वाली गाण्यास सुरुवात केली. 






गझल सम्राटच्या एका कॉन्सर्टमध्ये जावेद अलीला गाण्याची संधी मिळाली. त्याच वेळी जावेद अली हा चांगला गायक होईल असे अनेकांनी सांगितले.  जावेद अलीचा खरे नाव जावेद हुसैन आहे. मात्र, त्याने अली हे नाव लावले. जावेदचा असा दावा आहे की, यामुळे त्याच्या करिअरमध्ये मोठा बदल झाला. 


जावेद अलीचा संघर्ष 


गायक बनण्याच्या इराद्याने जावेद अली मुंबईत आला आणि येथूनच त्याचा खरा संघर्ष सुरू झाला. जावेद अलीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो अत्यंत सामान्य, गरीब कुटुंबातून आला आहे आणि जेव्हा तो नव्याने मुंबईत आला तेव्हा तो अनेक लोकांसोबत एका खोलीत राहत असे.






कधी जेवायलाही पैसे नसायचे तर कधी बसने जायलाही पैसे नसायचे. त्यामुळे अनेकदा पायपीट करत स्टुडिओ गाठले आहे.  2007 मध्ये अब्बास-मस्तान यांनी जावेद अली यांना त्यांच्या नकाब या चित्रपटात पहिली संधी दिली. जावेद अलीचे चित्रपटसृष्टीतील पहिले गाणे 'एक दिन तेरी राहों में' हे गाणे सुपरहिट ठरले.


यानंतर जावेद अलीने अनेक सुपरहिट गाणी गायली. जावेद अलीने हिंदीशिवाय कन्नड, तमिळ, मराठी, उडिया, तमिळ, तेलगू आणि उर्दू भाषांमध्येही गाणी गायली आहेत. जावेद अली 'सारेगामा' आणि 'इंडियन आयडॉल' सारख्या शोमध्ये जज म्हणूनही दिसला आहे.


जावेद अलीची संपत्ती किती?


गायक जावेद अली हा पार्श्वगायक आहेत पण त्याला खरेतर गझल गायक व्हायचे होते. लहानपणापासूनच गझल गाण्याची आवड होती आणि आताही जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ते छंद म्हणून गझल गातात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जावेद अली एका गाण्यासाठी 5 ते 10 लाख रुपये इतके मानधन घेतात. काही वृत्तांनुसार, जावेद अलीची एकूण संपत्ती 30 ते 40 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, त्याची अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नाही.