Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सिद्धार्थचं संपूर्ण नाव 'सिद्धार्थ रामचंद्र जाधव' असं आहे. मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही सिद्धार्थने स्वत:ला सिद्ध केलं आहे. नाटक, मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून सिद्धार्थने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे.
'गोलमाल' आणि 'गोलमाल रिटर्न्स' या सारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये सिद्धार्थने अभिनय केला आहे. मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत असणार्या 'अमी सुभाष बोल'ची नावाच्या बंगाली चित्रपटातही जाधव यांनी अभिनय केला होता. सिद्धार्थने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात अगदी लहान वयातच केली. रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केले. तो पहिल्यांदा देवेंद्र पेम यांच्या ‘तुमचा मुलगा करतो काय’ या नाटकामधून प्रकाशझोतात आला.
जागो मोहन प्यारे, तुमचा मुलगा करतोय काय, लोच्या झाला रे, गेला उडत या नाटकांमध्ये सिद्धार्थने काम केलं आहे. तसेच हसा चकट फू, सा चकट फू, घडलंय बिघडलंय, आपण यांना हसलात का? बा, बहू और बेबी, हे तर काहीच नाय, आता होऊ दे धिंगाणा यांसारख्या छोट्या पडद्यावरील हिंदी-मराठी मालिकांच्या माध्यमातून सिद्धार्थ घराघरांत पोहोचला आहे.
सिद्धार्थचा सिनेप्रवास
अगं बाई अर्रेचा!, जत्रा, बकुळा नामदेव घोटाळे, साडे माडे तीन, दे धक्का, बाप रे बाप डोक्याला ताप, गलगडे निघाले, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, हुप्पा हु्य्या, शिक्षणाच्या आयचा घो, लालबाग परळ, कुटुंब, टाईम प्लीज अशा अनेक लोकप्रिय सिनेमांच्या माध्यमातून सिद्धार्थ जाधव रुपेरी पडद्यावर झळकला आहे. सिद्धार्थने मराठी चित्रपटांत निरनिराळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.
सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. 'आपला सिद्धू' अशी त्याची ओळख आहे. उत्तम अभिनयशैली, साधी राहणी आणि प्रत्येकाला अगदी आपल्यातलाच वाटावा असा प्रेमळ स्वभाव, यामुळे सिद्धार्थ कायम प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो. सध्या तो 'अफलातून' सिनेमामुळे चर्चेत आहे. त्यामुळे ‘कॉमेडी किंग’ सिद्धार्थ जाधवची भन्नाट कॉमेडी तुम्हाला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या