Shraddha Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रद्धाने 2010 साली 'तीन पत्ती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु, त्या काळात तिला फारशी ओळख मिळू शकली नाही. 2013 मध्ये तिचा 'आशिकी 2' हा चित्रपट रिलीज झाला आणि ती रातोरात स्टार बनली. श्रद्धा कपूरच्या अभिनय कारकिर्दीत सलमान खानला तिचे स्टारडम वाढवायचे होते. परंतु श्रद्धाने त्याची ऑफर नाकारली होती.


 सलमान खानने श्रद्धाला 16 व्या वर्षी शाळेत नाटकात भूमिका करताना पाहिले होते. श्रद्धाच्या अभिनयाचा चाहता असल्याने सलमानने तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची ऑफर दिली होती. परंतु, त्या काळात श्रद्धाला अभ्यास करायचा होता. तिला मानसशास्त्रज्ञ व्हायचे होते. त्यामुळेच तिने सलमान खानची ऑफर नाकारली होती.


सलमानची ऑफर नाकारल्यानंतर श्रद्धा शिकण्यासाठी परदेशात गेली. बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये वर्षभर शिक्षण घेतल्यानंतर ती सुट्टीवर घरी परतली त्यावेळी तिचे फेसबुक प्रोफाइल पाहून चित्रपट निर्मात्या अंबिका हिंदुजा यांनी तिला चित्रपटाची ऑफर दिली. यावेळी श्रध्दा कपूरला नकार देता आला नाही आणि तिने तीन पत्ती चित्रपटासाठी होकार दिला.  


श्रद्धाचा पहिला चित्रपट तीन पत्ती बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. याचा श्रद्धाच्या मनावर खोलवर परिणाम झाला. कारण तिने चित्रपटासाठी आपला अभ्यास सोडला होता. परंतु, नंतर तिने कठोर परिश्रम केले आणि इंडस्ट्रीत आपले नाव कमावले. श्रद्धा कपूरच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिची पर्सनल लाईफही खूप चर्चेत आहे.


सध्या श्रद्धाचे नाव प्रसिद्ध फोटोग्राफर रोहनसोबत जोडले जात आहे. यावर तिने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसले तरी काही दिवसांपूर्वी वडील शक्ती कपूर यांनी मुलीच्या अफेअरच्या चर्चेवर मौन सोडले आहे. 'इंटरनेटवर कोणत्या प्रकारच्या बातम्या येत आहेत हे त्यांना माहिती नाही. पण मी नक्कीच मुलीच्या पाठीशी उभा राहीन, असे शक्ती कपूर यांनी म्हटले आहे.


महत्वाच्या बातम्या