Shilpa-Richard Kiss Case: अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि वाद यांचे जुने नाते आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या हॉलिवूड स्टार रिचर्ड गेरसोबतच्या 'किस' प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात शिल्पा शेट्टीला कोर्टाकडून क्लिन चीट मिळाल्यानंतर अल्वर पोलिसांनी त्याविरोधात वरील कोर्टात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. शिल्पा शेट्टीने याला विरोध केला असून ही याचिका फेटाळण्याची विनंती कोर्टासमोर केली आहे. 


शिल्पाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. रिचर्ड आणि शिल्पा या दोघांवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत दोघांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. 


शिल्पा शेट्टीने याचिकेत म्हटले की, घटनेच्या वेळी रिचर्ड गेरे यांनी चुंबन घेतले तेव्हा त्या कृत्याला विरोध केला नाही, असा एकमेव आरोप लावण्यात आला आहे. मात्र, विरोध न करणे म्हणजे कटात सामिल आहोत, असा अर्थ होत नाही. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शिल्पा शेट्टीचे वकील अॅड. प्रशांत पाटील यांनी म्हटले की, शिल्पा शेट्टी या मूळ तक्रारदाराकडून होत असलेल्या दुर्भावनापूर्ण आणि छळाच्या बळी आहेत. याचिकाकर्त्या या अभिनेत्री असून सार्वजनिक आणि खासगी आयुष्यात त्यांचे वर्तन जबाबदार नागरिकासारखे राहिले आहे. 


जानेवारीत मॅजिस्ट्रेट कोर्टाने काय म्हटले?


याच वर्षी जानेवारी महिन्यात मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट केतकी चव्हाण यांनी शिल्पा शेट्टीची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती. या प्रकरणात शिल्पा शेट्टी पीडित असल्याचे सांगत क्लीन चीट देण्यात आली. शिल्पा शेट्टीविरोधातील आरोप निराधार असल्याचेही मॅजिस्ट्रेटने आपल्या निकालात म्हटले होते. मॅजिस्ट्रेटच्या या निर्णयाला अल्वर पोलिसांनी आव्हान दिले आहे.


प्रकरण काय?


दिल्लीमध्ये वर्ष 2007 मध्ये एड्स जनजागृती कार्यक्रमात शिल्पा शेट्टीसह रिचर्ड गेरेदेखील आले होते. त्यावेळी व्यासपीठावर गेरे यांनी शिल्पाच्या गालाचे चुंबन घेतले. या घटनेनंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी शिल्पा शेट्टी आणि रिचर्ड गेरे यांच्यावर समाजात अश्लीलता फैलावत असल्याचा आरोप केला. त्यानंतर दोघांविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.