Sharad Ponkshe : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून कॅन्सरवर मात करुन आनंदाने आयुष्य जगणाऱ्या लढवय्यांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कॅन्सरवर मात केलेली अनेक मंडळी उपस्थित होते. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते आणि कॅन्सरवर मात करणारे शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दरम्यान संकटाला स्वीकारा, मार्ग सापडले असा संदेश शरद पोंक्षे यांनी कॅन्सरग्रस्तांना दिला.


कार्यक्रमादरम्यान शरद पोंक्षे म्हणाले,"कॅन्सरचं मी आभार मानतो. या रोगाने मला पुन्हा खडबडून जागं केलं आणि संत साहित्याच्या जवळ नेलं. संत ज्ञानेश्वर माऊलींपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत. संतानी आपल्याला शून्य व्हायला शिकवलं आहे. आपण याच गोष्टीचा कधी विचार करत नाही. न्यूटन म्हणतो वरचं सगळं खाली येतं. वर कसं जायचं ते ज्ञानेश्वर माऊली सांगतात". 


संकटाचं स्वागत केलं की तुम्हाला पुढचा मार्ग दिसेल : शरद पोंक्षे


शरद पोंक्षे पुढे म्हणाले,"कॅन्सरसारखे मोठे आजार शून्य व्हायला शिकवतात. त्यामुळे या आजाराचे रोज आभार मानले पाहिजेत. आयुष्यात कधीच कुठे न मिळणारी गोष्ट हा एक आजार भरभरून देतो. संपूर्ण जगाकडे बघायचा दृष्टिकोण बदलतो. संकटाचं स्वागत केलं की तुम्हाला पुढचा मार्ग दिसेल. 


कॅन्सरग्रस्तांना संदेश देत शरद पोंक्षे म्हणाले,"घाबरू नका...संकटे येत असतात. प्रत्येक संकटाचा एक काळ असतो. तेवढा काळ त्याला द्यावा लागतो. संकटाला स्वीकारा. संकटाचा स्वीकार करायला जेवढा उशीर कराल तेवढा संकटातून बाहेर पडायचा मार्ग उशीरा सापडणार. शांतपणे स्वीकार करा आणि मग लढाई लढायला सुरुवात करा. तुम्ही नक्कीच जिंकणार". 


हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे यांना 2018 च्या डिसेंबरमध्ये कॅन्सरचे निदान झाले. पण त्यानंतर आता ते या आजारावर मात करत पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. काही दिवसांपूर्वी त्यांनी 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेला रामराम ठोकला. आता त्यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.


शरद पोंक्षे यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली आहे. त्यानंतर त्यांनी अभिनयासह व्याख्याने द्यायला सुरुवात केली. 'सावरकर' हा त्यांच्या व्याख्यानांचा विषय आहे. आजही अनेक ठिकाणी ते 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या विषयावर व्याख्याने देतात. शरद पोंक्षे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. अभिनयाच्या जोरावर शरद पोंक्षे आज घराघरांत पोहोचले आहेत.



संबंधित बातम्या


Sharad Ponkshe : अभिनय, व्याख्याने तर कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' फेम शरद पोंक्षे; जाणून घ्या त्यांचा सिनेप्रवास...