Shanta Tambe: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे (Shanta Tambe) यांचे सोमवारी (19 जून) निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शांता तांबे यांनी त्यांच्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली होती. शांता तांबे यांनी नाटकामध्ये काम करुन अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. देश बंधू संगीत मंडळी यांच्या नाटकात त्यांनी काम केले होते.
दिग्गजांसोबत शांता तांबेंनी केलं काम
भालजी पेंढारकर (Bhalji Pendharkar), दिनकर पाटील (Dinkar D. Patil), अनंत माने (Anant Mane) आदी दिग्गज दिग्दर्शकांसोबत शांता तांबे यांनी काम केले. मोहित्यांची मंजुळा (Mohityanchi Manjula), सवाल माझा ऐका (Sawaal Majha Aika), मोलकरीण (Molkarin), बाई मोठी भाग्याची (Bai Mothi Bhagyachi), मर्दानी (Mardaani) अशा अनेक चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने चित्रपटांमध्ये काम करण्याचे ठरवले होते, असे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते. दोन बायका फजिती ऐका (Don Baika Phajeeti Aika), चांडाळ चौकडी (Chandaal Chowkadi ), असला नवरा नको गं बाई (Asla Navra Nako Ga Bai), सोंगाड्या, चंदनाची चोळी या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले होते.
एका मुलाखतीमध्ये शांता तांबे यांनी सांगितलं होतं, 'मी जेव्हा अभिनयक्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा, आता जसे लोक अभिनय करायचाच आहे, अशा उद्देशानं या क्षेत्रात येतात तशा उद्देशानं मी या क्षेत्रात आले नव्हते. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने मी या क्षेत्रात आले. पण अभिनयक्षेत्रात आल्यानंतर मी या क्षेत्रात प्रगती केली. मला चांगले दिग्दर्शक मिळाले. देश बंधू संगीत मंडळी यांच्या नाटकामध्ये मी काम केलं. चार महिने मी त्यांच्यासोबत काम केलं. तिथेही मला लोक चांगले मिळेल. त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.
सध्याच्या चित्रपटांबाबत शांता तांबे म्हणाल्या होत्या, 'आताचे सर्व चित्रपट कॉमिक आहेत. ते चित्रपट सर्व चांगले आहे. त्याकाळातील कथानक वेगळे आताचे वेगळे आहेत. दिग्दर्शकही वेगळे असतात. त्यांचे काम देखील वेगळे असते. आम्हाला त्या काळी चांगले दिग्दर्शक मिळेल. त्यामुळे मला अभिनय देखील चांगला करता आला.' शांता तांबे यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :